
मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात!, असा थेट निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या सभेतून महाविकास आघाडीवर आणि विशेषत: ठाकरे गटावर निशाणा साधला होता. कितीही रावण आले तरी मोदीच विजयी होतील, असं म्हणत शिंदेंनी टीका केली या टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काहीही बोलू द्या. त्यांनी शिवसेना शब्दच उच्चारू नये. स्वयंघोषित शिवसेनेचे मुख्यमंत्री होतात. भांडी भाजपची घासतात आणि गुणगाण भाजपच्या नेत्यांचं करत आहेत. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असूच शकत नाही. थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला. स्वत:च्या पक्षाबाबत बोला. त्यांनी रोज सकाळी उठल्यापासून मोदी स्त्रोत सुरू केलं आहे, असं म्हणत संजय राऊतांनी घणाघात केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं विचारता मग मराठा आरक्षणावर काय केलं हे मोदींना विचारा. तुमच्या हातात आहे. मिस्टर मोदी, मिस्टर एकनाथ शिंदे तुम्ही शिर्डीला येता साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता, भंपकपणा करता. दिशाभूल करता आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषण बसले आहेत. उलट मोदींनीच मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही संजय राऊत यांनी सवाल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही काय करताय? तुम्ही जरांगे पाटील यांना दिल्लीत का घेऊन आला नाही हे मोदींनी मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे होतं. पण शरद पवार, उद्धव ठाकरे अमूक तमूक त्यांच्या व्यासपिठावर एकजात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोकं बसले होते आणि हे भ्रष्टाचार संपवायला निघाले आहेत. हे एक नंबरचे खोटारडे लोकं आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय.