Mumbai : कुठे, किती वाजता होणार स्फोट? टार्गेटवर कोण? मुंबईला मिळालेल्या धमकीच्या मेलमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मुंबईत विधानभवन, बीएसई आणि मेट्रोसह महत्त्वाच्या ठिकाणांना मिसाईलने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलमध्ये स्फोटांची वेळ, ठिकाणे आणि देशातील सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याचे नमूद केल्याने खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

Mumbai : कुठे, किती वाजता होणार स्फोट? टार्गेटवर कोण? मुंबईला मिळालेल्या धमकीच्या मेलमध्ये नेमकं काय म्हटलंय?
mumbai blast mail
| Updated on: Mar 12, 2026 | 12:28 PM

सध्या इराण इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्घामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधानभवन, मेट्रो, न्यायालय आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मिसाईलने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत एक निनावी ईमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे, या ईमेलमध्ये देशातील सर्वोच्च नेत्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्यानेळ खळबळ उडाली आहे.

मुंबईला मिळालेल्या धमकीच्या मेलमध्ये नेमके काय?

मुंबईला मिळालेला हा धमकीचा ईमेल सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी आला. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, अधिवेशनादरम्यान खालिस्तान्यांना पाठिंबा द्या, अन्यथा मुंबईतील मुख्य ठिकाणांवर मिसाईल अटॅक केला जाईल. या ईमेलमध्ये केवळ धमकीच नाही, तर मुंबईतील कोणत्या ठिकाणी किती वाजता स्फोट होतील, त्याचा वेळापत्रकासह उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जागाही नमूद करण्यात आल्या आहेत.

कुठे आणि कधी होणार ब्लास्ट?

  • बीएसई (BSE): दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी
  • बँक: दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी
  • कोर्ट: दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी
  • विधानभवन: दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी
  • मेट्रो: रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी

टार्गेटवर कोण?

या निनावी ईमेलमध्ये मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो, बँक आणि विधानभवन या जागांचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठिकाणी मिसाईल हल्ले केले जातील, असेही यात नमूद करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आमच्या निशाण्यावर आहेत, असेही यात म्हटले आहे. या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या असून विधानभवन आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभरासाठी अभ्यागतांना विधिमंडळात प्रवेश बंदी केली आहे. तसेच, सर्व प्रकारचे प्रवेश पास तात्पुरते रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सध्या पोलीस या ईमेलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत आहेत. याप्रकरणी एक तक्रार नोंदवण्यात आली असून विधानसभेतील वरिष्ठ अधिकारी आणि सायबर सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us