मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता टॅक्सी भाड्यावरून वाद नाही, थेट फिक्स रेट; प्रीपेड टॅक्सी काउंटर सुरू होणार, पण कुठे?
Fixed-Fare Taxi Services Planned at Railway Stations: प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ६ स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या सहा प्रमुख स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना लवकरच टॅक्सीच्या भाड्यावरून घासाघीस करण्याचा नेहमीचा त्रास टाळता येणार आहे. अतिरिक्त भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी आणि दरांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रीपेड टॅक्सी काउंटर सुरू करणार आहे. ही सुविधा मुंबई सेंट्रल टर्मिनस, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, विरार आणि पालघर येथे प्रस्तावित आहे, जिथे मोठ्या संख्येने लांब पल्ल्याचे प्रवासी पुढील प्रवासासाठी टॅक्सीवर अवलंबून असतात.
या स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वाहतूक होते. येथे येणारे अनेक प्रवासी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी टॅक्सीवर अवलंबून असतात. चालक मीटरनुसार भाडे आकारण्यास नकार देतात आणि मनमानी भाडे मागतात. अशा तक्रारी प्रवाशांकडून अनेकदा केल्या जातात. मुंबईचे मार्ग आणि प्रचलित दरांची माहिती नसलेल्या विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामानासह प्रवास करणाऱ्या लोकांना भाड्याची वाटाघाटी करताना अडचणी येतात.
पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावित सुविधा मुंबई विमानतळावरील प्रीपेड टॅक्सी प्रणालीच्या धर्तीवर काम करेल. आम्ही आता सहा प्रमुख स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करून या समस्यांचे निराकरण करण्याची योजना आखत आहोत. ज्यामुळे प्रवाशांना गाडीत चढण्यापूर्वी एक निश्चित भाडे भरता येईल. या स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वाहतूक होते आणि अनेक येणारे प्रवासी घरी पोहोचण्यासाठी टॅक्सीवर अवलंबून असतात, विशेषतः जेव्हा स्थानिक वाहतुकीचे पर्याय मर्यादित किंवा गैरसोयीचे असतात, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रस्तावित व्यवस्थेनुसार, प्रवासी स्टेशनबाहेरील काउंटरवर जाऊन आपले गंतव्यस्थान सांगतील. एक संगणकीकृत प्रणाली अंतर आणि लागू दराच्या आधारे भाड्याची गणना करेल. पैसे भरल्यानंतर प्रवाशांना एक पावती मिळेल आणि ते एका निश्चित रांगेतून टॅक्सीत बसतील. वाद निर्माण झाल्यास तक्रार नोंदवण्याच्या यंत्रणेचा तपशीलही पावतीवर असेल. स्थानक परिसराबाहेर प्रवाशांची वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि वाहतुकीची उपलब्धता सुधारण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब ॲग्रीगेटर्ससाठी स्वतंत्र रांगा प्रस्तावित आहेत.
मुंबईचे मार्ग आणि भाडेदर माहीत नसलेले बाहेरगावचे प्रवासी, तसेच सामानासह प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक विशेषतः असुरक्षित आहेत. याच कारणामुळे आम्ही प्रीपेड टॅक्सी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी आम्ही संघटनांशी चर्चा करत आहोत, असे पश्चिम रेल्वेच्या आणखी एका अधिकाऱ्याने अहवालानुसार सांगितले. प्रस्तावित प्रणालीमुळे भाड्यावरून होणारी घासाघीस आणि सामानासाठीच्या अतिरिक्त शुल्काच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे.
टॅक्सी चालक या योजनेत सहभागी होतील की नाही, हे ठरवण्यात भाड्याची रचना आणि चालकांना दिले जाणारे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे. चर्चेत असलेल्या व्यवस्थेनुसार, कापलेले अंतर आणि लागू असलेल्या दरानुसार मोजलेल्या प्रत्यक्ष भाड्यावर चालकांना अतिरिक्त टक्केवारी मिळू शकते. पश्चिम रेल्वे निविदा प्रक्रिया सुरू करेल आणि प्रीपेड बूथ उभारण्याची व्यवस्था करेल.
आम्ही निविदा प्रक्रिया सुरू करू आणि बूथ उभारण्याची व्यवस्था करू. पहिल्या टप्प्याच्या यशाचे मूल्यांकन केल्यानंतर या सेवेचा विस्तार केला जाईल. वैध परवान्याशिवाय चालणाऱ्या टॅक्सी स्टेशन परिसरात प्रवेश करणार नाहीत, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वाहतूक पोलीस आणि आरटीओचीही मदत घेऊ, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. मध्य रेल्वेची आपल्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर अशीच सुविधा सुरू करण्याची कोणतीही तात्काळ योजना नाही. सध्या ती नागपूर आणि पुणे येथे प्रीपेड टॅक्सी सेवा चालवते.