मुंबईत ATS ची मोठी कारवाई, जैश ए मोहम्मदशी संबंधित एकाला माहिममधून उचललं
Mumbai ATS Action: मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने ATS ने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित एकाला माहिममधून उचललं आहे. त्याच्याकडे अनेक आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट आणि अजहर मसूदच्या ऑडिओ क्लिप आढळून आल्या.

Mumbai ATS Action: मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने माहिम परिसरात मोठी कारवाई केली. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याच्या आरोपावरून ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली. आरोपी हा इत्र विक्री करत असल्याचे आणि बाईक रायडर असल्याची माहितीही समोर येत आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याच्या ऑडिओ क्लिपही त्याच्या मोबाईलमध्ये आढळल्या आहेत. या कारवाईमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. मोहम्मद हसन याच्याकडून आता पुढील चौकशीत तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती येण्याची शक्यता आहे.
माहिममध्ये एटीएसची थेट कारवाई
ATS च्या काळाचौकी युनिटने माहिम मेट्रो स्टेशनजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये प्रक्षोभक पोस्ट आणि जिहादचे समर्थन करणारे संदेश आढळल्याचा ATS चा दावा आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या भाषणांचे ऑडिओही मोबाईलमध्ये सापडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ही या परिसरातील मोठी कारवाई मानली जात आहे.
सोशल मीडियातून जिहादी विखार
सोशल मीडिया पोस्टमधून मुस्लिमांना शस्त्र उचलण्यास प्रवृत्त केल्याचाही संशय आरोपीवर आहे. आरोपी टेलिग्राम ग्रुप चालवत होता, त्यावर मसूद अजहरच्या भाषणांचे ऑडिओ अपलोड केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क आणि आरोपीच्या ऑनलाइन हालचालींचा ATS कडून तपास करण्यात येत आहे. आरोपीविरोधात BNS कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल, इतर संशयित संपर्कांचीही चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेला मोहम्मद हसन अबू शरमद अख्तर हा बाईक रायडर आणि इत्र, अत्तर विक्रेता असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवसायाच्या आडून तो विखारी विचार पसरवत असल्याची माहिती समोर येत आहे. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडल्याचे समोर आले आहे. तो देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय होता का, याचा तपास आता एटीएस करत आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिटने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे.
