‘तुमचे चेहरे दिसले, सटका लवकर…’ टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा, सूचना देणारी ती व्यक्ती कोण?
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेची खडान खडा माहिती सूत्रधारापर्यंत पोहचत होती. तर माध्यमांमध्ये याविषयी काय सुरू आहे यावरून हल्लेखोरांना पुढील सूचना देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर 18 ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात अंधाधुंद गोळीबार झाला. यामध्ये तो जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणात 10 हून अधिक आरोपींना अटक केली. त्यात काही तरुण आणि तरुणींचा समावेश आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या माध्यमातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे. केवळ टायगरच नाही तर बॉलिवूडचे इतर सेलेब्रिटी हल्लेखोरांच्या टार्गेटवर होते असे समोर आले आहे. तर या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या हल्ल्याची खडान खडा माहिती सूत्रधारापर्यंत पोहचत होती. तर माध्यमांमध्ये आरोपींचे चेहरे दिसल्यावर त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. हा सूत्रधार कोण याचा आता पोलीस तपास करत आहे.
शूटर्सला मिळत होते सर्व अपडेटस
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शूटर्सला सर्व अपडेट्स मिळत होते. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना नवनवीन आणि थक्क करणारी माहिती मिळत आहे. हा एक सुनियोजित कटाचा भाग होता हे आता समोर आले आहे. हल्ल्यानंतर शूटर्सना कुठे आणि कसे पळून जायचे. कुठे लपायचे याचे मार्गदर्शन करण्यात येत होते. तर हल्ल्यानंतरचे वृत्त, माध्यमांवर झळकले. आरोपींचे चेहरीही समोर आले. त्यानंतर या बातम्यांआधारे हँडलर्स फोन कॉल्स आणि मॅसेजच्या माध्यमातून हल्लेखोरांना वेळोवेळी पुढील अपडेट्स आणि सूचना देत असल्याचे समोर आले आहे. आता ही सूचना देणारी व्यक्ती कोण याचा पोलीस छडा लावत आहेत.
तुमचे चेहरे टीव्हीवर, पटकन निघा
जुहू परिसरात फुटबॉल खेळून बाहेर पडला. टायगर श्रॉफ हा कारमधून त्याच्या चाहत्याशी संवाद साधणार तोच शूटर्सनी तो बसलेल्या बाजूने थेट सात राऊंड फायर केले. दोन शूटर्स धडाधड गोळ्या झाडून पळाले. त्याचा वाहन चालक आणि एक यूट्यूबर यामध्ये जखमी झाला. टायगर श्रॉफही जखमी झाला. या गोळीबाराचा व्हिडिओ माध्यमांवर दिसला. त्यात आरोपींचे चेहरे दिसले. त्यानंतर हँडलरने हल्लेखोरोंना, तुमचे चेहरे टीव्हीवर दिसले, आता पटकन निघा. सुरक्षित ठिकाणी पोहचा अशा सूचना दिल्या.
आतापर्यंत 10 हून अधिक जण अटकेत
हे हँडलर्स आणि हल्लेखोर एकमेकांशी मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून नाही तर इंटरनेट आधारित एनक्रिप्टेड ॲप्स आणि कॉल्सच्या माध्यमातून संपर्कात होते. मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणात आतापर्यंत 10 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. त्यात कोटा येथून फुलसिंग, रेहान अन्सारी आणि ऋतिक महतो या तिघांना अटक करण्यात आली. तर दिल्ली आणि हरियाणा येथून शस्त्र पुरवठा आणि मदत केल्याप्रकरणात कुणाल सिंग, सुमित सोरोलिया, राधा वर्मा आणि बबिता राव, सोनीपत येथून समीर, जतिन आणि अंकित खटक यांना अटक करण्यात आली आहे.
