Maratha Andolan : राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सणसणीत टोला; म्हणाले, पोटातील ओठात…

मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवसानंतर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण सोडलं. मात्र, आपलं उपोषण सुटलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Maratha Andolan : राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सणसणीत टोला; म्हणाले, पोटातील ओठात...
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 14, 2023 | 5:43 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचं उपोषण सोडलं. त्यामुळे मराठा आंदोलन तूर्तास थांबलं आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याने विविध राजकीय पक्षांनी त्याचं स्वागत केलं आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्टद्वारे जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी गेले 17 दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

पुन्हा लाठ्याकाठ्या बरसू नयेत

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले 17 ते 18 दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये.

चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा आहे, असं सांगतानाच सरकार या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो, असा चिमटाही राज ठाकरे यांनी काढला आहे.

मागे हटणार नाही

दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी घरी जाणार नाही. इथेच थांबणार आहे. आमचं साखळी उपोषण सुरू राहील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. समाजाच्या हिताचा निर्णय घेईल त्याशिवाय मागे हटणार नाही, हे मी सांगतच आलोय. माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी 10 दिवस वाढवून देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांनाही हटू देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.