
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणुका घेणे अपरिहार्य असून, येत्या तीन महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. यावेळी शरद पवारांनी महाविकासाआघाडीसोबत निवडणूक लढवणार की नाही, याबद्दलही भाष्य केले.
शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिका निवडणुकांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत आम्ही अजून काही चर्चा केली नाही. आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे आता निवडणूक लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. त्यात आम्ही सर्वजण सहभागी होऊ, असे शरद पवार म्हणाले.
यावेळी त्यांना इतर पक्षांसोबत चर्चा करण्याबद्दल विचारणा करण्यात आली. आमच्या इतर घटक पक्षाशी आम्ही चर्चा केलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना आहे. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरी जाता येईल का, याबद्दल चर्चा करु. पण आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
यावेळी शरद पवारांनी विशेषतः मुंबईच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्राबल्य मान्य केले. “मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल,” असे शरद पवारांनी नमूद केले. मुंबईतील जागेवाटपात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल असे संकेत दिले. महाविकासआघाडी म्हणून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागले, असेही शरद पवारांनी म्हटले.