कुंडमळा पुलासाठी आठ कोटी मंजूर, सही ८० हजाराच्या पत्रावर…, संजय राऊत यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहे. त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आला आहे. आता ते कुंडमळा दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

कुंडमळा पुलासाठी आठ कोटी मंजूर, सही ८० हजाराच्या पत्रावर..., संजय राऊत यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप
sanjay raut PC
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 11:26 AM

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो की इंद्रायणी नदीवरील पूल हे भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. या दोन्ही दुर्देवी घटना केवळ भ्रष्टाचारामुळे घडल्या आहेत. इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमळा जोड रस्त्याच्या कामांना ११ जुलै २०२४ रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली. या कामासाठी १५ कोटींचा निधी मागितला होता. पण आठ कोटी रुपये मंजूर झाले आणि ८० हजारांच्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली. हे पत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यास दिले, असा आरोप शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कुंडमळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार गप्प बसले आहेत. त्या भागातील त्याचे आमदार सुनील शेळकेही बोलत नाही. ते सर्व आहेत कुठे? अजित पवार यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, चौकशीचे आदेश दिले आहेत. खरे म्हणजे त्यांचीच चौकशी केली पाहिजे. कालचे बळी हे भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचा विषय असो की कुंडमळा येथील घटना ज्या ज्या ठिकाणी दुर्देवी प्रकार घडत आहेत, त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचे नाव येत आहे, असे राऊत यांनी म्हटले.

पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथील पूल कोसळला. त्यात किती लोकांचा मृत्यू झाले, त्याचा खरा आकडा आला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहे. त्यांना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अहंकार आला आहे. आता ते त्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का? अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत. त्यांना घेऊन ते सतत फिरत असतात. परंतु एक, दोन कोटींचा पूल अनेक वर्षांत पालकमंत्री उभे करु शकले नाही. पालकमंत्री मेट्रोची कामे, बिल्डराची कामे करत असतात. कुंडमळा येथील घटनेस जबाबदार कोण? हे अजित पवार यांनी सांगितले पाहिजे. त्या पुलास पैसे मंजूर झाले. मग मंजूर झालेले पैसे गेले कुठे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर तो कोसळला होता. त्यानंतर महिन्याभरापूर्वी नवीन पुतळा बसवला. त्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. त्या ठिकाणी माती खचली आहे. गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा समुद्रात आहे. त्या पुतळ्यास ६० वर्ष झाला आहे. ते सर्व पुतळे सुरक्षित आहे. कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.