Lawrence Bishnoi: बॉलिवूडला हादरवण्याचा मोठा प्लॅन, तरीही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मुंबई पोलीस का घेऊ शकत नाहीत ताब्यात? हे आहे सर्वात मोठं कारण…
Tiger Shroff Firing Case: गेल्या काही वर्षात लॉरेन्स बिश्नोई गँगने बॉलिवूडला वेठीस धरले आहे. आता केवळ धमकीच नाही तर थेट गोळीबार करण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. मग त्याला तपासासाठी मुंबई वा इतर पोलीस ताब्यात का घेऊ शकत नाहीत?

Lawrence Bishnoi into custody : बॉलिवूडला हादरवण्याचा प्लॅन आखणाऱ्या बिष्णोई टोळीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्या दिशेने रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी साडेसात वाजता जुहू परिसरात धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या. तो कारमध्ये असताना हा प्रकार घडला. तो थोडक्यात बचावला. पण त्यानंतरच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपींनी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान याच्यासह अक्षय कुमारच्या घराची रेकी केल्याचे समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. मग त्याला तपासासाठी मुंबई वा इतर पोलीस ताब्यात का घेऊ शकत नाहीत?
केंद्रीय गृह मंत्रालयाचा तो आदेश?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील अत्यंत सुरक्षित साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. ऑगस्ट 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम 268 अंतर्गत त्यासाठी एक विशेष आदेश दिला आहे. सध्याच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 303 नुसार हा आदेश अद्याप लागू आहे. तो गेल्या तीन वर्षात वेळोवेळी वाढवण्यात आला आहे.
या कायद्यानुसार, केंद्र अथवा राज्य सरकारला एक विशेष अधिकार देण्यात आला आहे. एखाद्या धोकादायक कैद्याला सुरक्षेच्या कारणास्तव अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कारागृहातून बाहेर नेण्यास अथवा इतर राज्यांच्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यास बंदी आहे. यामुळे लॉरेन्स बिश्नोई हा अनेक प्रकरणात वॉन्टेड असला आणि त्याचे नेटवर्क, सूत्रधार यांची माहिती घ्यायची असली तरी त्याला ताब्यात घेता येत नाही.
मग कशी होते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण?
विशेष आदेशामुळे कोणत्याही राज्याची पोलीस यंत्रणा लॉरेन्स बिश्नोई याला साबरमती कारागृहातून हलवू शकत नाही. त्याला इतर राज्याच्या पोलिसांच्या ताब्यात देऊ शकत नाही. मग अशावेळी अधिकचा तपास थांबतो असे होत नाही. याप्रकरणात एक कायदेशीर मार्ग आहे.
ज्या ज्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. अथवा त्याच्या नावाने गुन्हे घडवले जात आहेत. त्यातील तपासासाठी आणि न्यायालयीन खटल्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. या खटल्यांसाठी लॉरेन्स बिश्नोई याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला हजर करण्यात येते.
अथवा अजून कायदेशीर मार्गानुसार, मुंबई पोलीस अथवा इतर राज्यातील पोलिसांना एखाद्या गुन्ह्यात त्याची चौकशी करायची असेल, तर पोलीस त्याचा थेट ताबा न मिळवता, कोर्टाच्य परवानगीने साबरमती तुरूंगात जाऊन त्याची चौकशी करू शकत नाही. बिश्नोई कुणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. पण त्याच्या नावावर गुन्हे सुरूच असल्याने त्याचे नेटवर्क शोधून ते उद्ध्वस्त करण्याचे मोठे आवाहन सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.