तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये झुरळं, उंदीर दिसताच परवाना रद्द
FDA Action : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात छापेमारी करून दोषींना धडा शिकवला जात आहे. अशातच आज FDA ने मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलचा परवाना रद्द केला आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभाग गेल्या काही काळापासून नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाई करत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात छापेमारी करून दोषींना धडा शिकवला जात आहे. अशातच आज FDA ने मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलचा परवाना रद्द केला आहे. या हॉटेलच्या स्वयंपाकघरात उंदीर, झुरळे आणि उघडी ड्रेनेज लाईन आढळून आली होती, त्यानंतर थेट परवाना रद्द करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मालाडमधील हॉटेलचा परवाना रद्द
FDA मुंबईतील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार FDA ने मालाड वेस्टमधील हॉटेल राधाचा फूड लायसन्स तात्काळ निलंबित केला आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या तपासणीत हॉटेलच्या स्वयंपाकघरात उंदीर, झुरळे आणि उघडी ड्रेनेज लाईन आढळून आली. पीठ मळण्याच्या मशीनवर थेट झुरळे रेंगाळत होती, तर एक मोठा उंदीर ड्रेनेजमधून बाहेर आला. हा गुन्हा गंभीर असल्याने FSS Act च्या कलम 32(3) अंतर्गत हॉटेलचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे विभागातही FDAची कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागामार्फत अन्नपदार्थांची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कारवाई करण्यात आली. 18 ऑगस्ट रोजी पुणे विभागातील एकूण चार आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत चारही आस्थापनांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण 1 लाख 14 हजार,598 कुरये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार एफआयआर दाखल करण्यात आले असून, चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच कारवाईदरम्यान तीन आस्थापने सील करण्यात आली असून, 15 हजार किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाने महाळुंगे येथील एका कंपनीची तपासणी केली. या तपासणीत काही अन्नपदार्थ संशयित निकृष्ट तसेच चुकीच्या लेबलिंगचे असल्याचे आढळून आले. या तपासणीदरम्यान खिचडी मसाला या अन्नपदार्थाचा 5098 किलो साठा, तसेच इतरही पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि लेबलिंगसंबंधी निर्धारित निकषांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.