तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा झटका… संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या 23 दिवसात… व्यापारी हादरले

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA ने सणासुदीत भेसळ रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या 23 दिवसांत 3068 दुकानांची तपासणी करून 248 परवाने निलंबित केले. यापुढे भेसळीवर नजर ठेवण्यासाठी 'फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल' सुरू केले आहे.

तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा झटका... संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या 23 दिवसात... व्यापारी हादरले
tukaram mundhe
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 10:34 AM

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना सर्वात मोठा झटका दिला आहे. ऐन सणासुदीत सप्टेंबरमध्ये अवघ्या 23 दिवसात मुंढे यांच्या टीमने 3,068 दुकानांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी 238 लायसन्स सस्पेंड केले आहेत. सणासुदीत खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंढे यांच्या टीमच्या या कारवाईने व्यापारी पुरते हादरले आहेत. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने सणासुदीच्या दिवसात खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी नवीन व्यवस्था सुरू केली आहे. प्रशासनाने ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल’ लॉन्च केलं आहे. संपूर्ण वर्षभर होणाऱ्या सणांसाठी हे पोर्टल उपयोगात येणार आहे. तसे आदेशच प्रशासनाने काढले आहेत.

या पोर्टलच्या माध्यमातून भेसळ आणि असुरक्षित खाद्यपदार्थांवर नजर ठेवली जाणार आहे. या व्यवस्थेमुळे कारवाई वेगवान होणार आहे. तसेच पारदर्शकता येणार असून ग्राहकांना वेळेत मदत मिळणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सणांच्या काळात काही खाद्यपदार्थांची मागणी अचानक वाढते. मोदक, पेढा, खवा, पनीर, दूध, दही, तूप, पनीर, गोडातेल, सुका मेवा आदींची या काळात मागणी वाढते. उपवासाच्यावेळी भगर, साबुदाना आणि राजगिरा आदींची मागणी वाढते. कमी वेळात अधिक मागणी वाढल्याने बाजारात भेसळयुक्त पदार्थ मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच एफडीएने या वर्षी पोर्टल लॉन्च केलं आहे. त्यामुळे या भेसळीवर नजर ठेवता येणार आहे.

पोर्टलमधून मिळणार माहिती

फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टलवर मकर संक्रातीपासून ख्रिसमसपर्यंतच्या वर्षभरातील सर्व सणांची माहिती मिळणार आहे. या सणांना तीन टप्प्यात विभागण्यात आलं आहे. लेव्हल एकमध्ये राज्य स्तरावरचे सण असणार आहेत. लेव्हल दोनमध्ये प्रादेशिक स्तरावरचे आणि लेव्हल तीनला स्थानिक सणांचा समावेश असणार आहे. फेस्टिव्हलच्या दरम्यान भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसाद आदी सामुहिक भोजन कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 90 झोनसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पोर्टलवर भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी 3,198 अर्ज ऑनलाइन आले आहेत. खबरादारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याांनी 383 ठिकाणी जाऊन पाहणी केली. या दरम्यान जेवण बनवण्याची जागा, पिण्याचे पाणी, कच्च्या सामानाची गुणवत्ता, भोजन ठेवण्याची जागा आणि कर्मचाऱ्यांची स्वच्छता आदी गोष्टींबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

3,068 दुकानांची तपासणी

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात 3,068 खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी काही त्रुटी आढळून आल्या अशा 1,506 दुकानांना सुधारण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 248 दुकानांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. तर 12 लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय 455 गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यातील 398 प्रकरणांचा निपटारा झाला आहे. या प्रकरणात एकूण 53.60 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us