
Raj Thackeray And Uddhav Thackeray Rally: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु शिवसेना उबाठा आणि मनसेच्या प्रचंड विरोधानंतर तो मागे घेण्यात आला. त्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसेने शनिवारी विजय मेळावा घेतला. या मेळाव्यातून शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपकडून भांडण लावण्याचे काम केले जाते, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण एकत्र (मनसे आणि शिवसेना उबाठा) आलो आहोत. पण पुन्हा आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे मी नेहमीच सांगतो भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका. ही लोक लग्नात येणार श्रीखंड अन् बांसुदी पोळ्या खातील आणि नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून घेऊन जातील. त्यांचे स्वत:चे काहीच नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी करत शिवसेना फुटीवरुन भाजपवर निशाणा साधला.
महानगरपालिकेसाठी मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्र आली आहे, अशी टीका केली जात आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काही जण म्हणतात, आमचा म मराठीचा नाही तर म महापालिकेचा आहे. पण आमचा म हा महाराष्ट्राचा आहे. सत्ता येते आणि जाते पण आपली ताकद एकत्र असली पाहिजे. संकट आलो की आपण एकत्र येतो आणि संकट गेले की आपण पुन्हा वेगळे होतो, असे होऊ नये, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या सर्वांकडून व्यक्त केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देशातील कोणत्याही लढ्यात भाजप नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेवटी आला. परंतु १९५७च्या निवडणुकीनंतर सर्वात आधी बाहेर पडला. तेव्हाचा जनसंघ म्हणजे आजचा भाजप आहे. त्या भाजपकडून आपण स्वाभिमान शिकायचा का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करत भाजपवर जोरदार हल्ला केला. मुंबईचा सर्वाधिक मालक कोण असेल तर यांच्या मालकाचा मित्र म्हणजे अदानी आहेत, असे त्यांनी सांगितले.