
लहान मुलांपासून ते मोथा-मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विन्स हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना पाहण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालया अर्थात राणीच्याबागेत मोठ्या संख्येने गर्दी होत असते. सर्वांच्या चर्चेचा, आकर्षणाचा विषय असलेल्या या पेंग्विन्सचया संख्येत आता वाढ झाली आहे. कारण या प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले झाली आहेत. यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे. त्यामुळे आता राणीच्या बागेतील पेंग्विनची एकूण संख्या 21 झाली आहे.
पेंग्विनच्या पिलांचे नामकरण
राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. त्यात ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने 4 मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘नॉडी’ ठेवण्यात आले आहे. तर डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिलेल्या अंड्यातून 7 मार्चला एक पिलू जन्मले असून त्याचे नाव ‘टॉम’ ठेवण्यात आले . आणि 11 मार्चला एक मादी पिल्लू जन्मले असून तिचे नाव ‘पिंगु’ ठेवण्यात आले आहे. ही तिन्ही पिले आता प्रदर्शन कक्षात आणण्यात आली आहेत. त्यामुळे राणीच्या बागेतील पेंग्विनची एकूण संख्या 21 झाली आहे. गेल्या चार वर्षात राणीच्या बागेत 11 नवीन पेंग्विन जन्माला आले आहेत.
मुंबईच्या राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन होते. सध्या असलेल्या पेंग्विनपैकी 11 माद्या आणि 10 नर आहेत.
पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग
दरम्यान राणीच्या बागेतील पेंग्विन्सच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग निर्माण झाला आहे. नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याप्रकरणी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर आंदोलन करणार आहे. पेंग्विन्सच्या पिल्लांची नावं नॉडी, टॉम व पिंगु अशी आहेत, पण त्या नावांना भाजपचा विरोध आहे. मुंबईत जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावे देण्याचा आग्रह करण्यात येत आहे. यांसदर्भात देण्यात आलेल्या निवेदनास एक महिना झाला तरी प्रशासनाने कानाडोळा केला असून त्यामुळे आता भाजप प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिकेत आहे.