संघावर बंदीचा प्रयत्न झाला, तेव्हा स्वयंसेवक नव्हे, मुस्लिम व्यक्ती आला धावून; मोहन भागवत यांचं मोठं विधान

मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये सांगितले की, १९३० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इब्राहिम नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने संघाचा बचाव केला. संघ सांप्रदायिक नाही हे त्याने स्पष्ट केले. स्वयंसेवक हीच संघाची खरी ओळख आहे, असेही भागवत यांनी नमूद केले.

संघावर बंदीचा प्रयत्न झाला, तेव्हा स्वयंसेवक नव्हे, मुस्लिम व्यक्ती आला धावून; मोहन भागवत यांचं मोठं विधान
mohan bhagwat
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 1:26 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जेव्हा बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा संघाचा स्वयंसेवक नव्हे तर एक मुस्लिम व्यक्ती बचावासाठी धावून आला होता. इब्राहिम असं त्याचं नाव होतं. त्याने सर्वात आधी संघाचं समर्थन केलं होतं, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी जे काही आवश्यक असतं ते आपोआप मिळतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

30च्या दशकामध्ये जेव्हा सेंट्रल प्रोव्हिन्सच्या विधानसभेत संघावर पहिल्यांदा बंदी घालण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा संघाचा बचाव करण्यासाठी एखादा स्वयंसेवक पुढे आला नव्हता. तेव्हा संघाच्या विचारधारेचं समर्थन करणारा कोणी नव्हता. तर त्यावेळी इब्राहिम नावाचा एक व्यक्ती पुढे आला होता. त्याने संघाचं समर्थन केलं होतं. संघावर बंदी आणू नका. संघ हा सांप्रदायिक नाहीये. मला वाटतं जे लोक म्हणतात हिंदुस्थान हे एक हिंदू राष्ट्र आहे, असं म्हणणाऱ्यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवलं पाहिजे. मी डॉ. हेडगेवार यांना ओळखतो. ते वेडे नाहीयेत. तर एक चांगले व्यक्ती आहेत. संघ हा कधीच सांप्रदायिक होऊ शकत नाही, असं या इब्राहिमने म्हटलं होतं, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

Loading...

स्वयंसेवक हीच संघाची ओळख

त्यावेळी संघाची स्थापना होऊन फक्त काही वर्ष झाली होती. तेव्हा संघाबाबत कमी लोकांना माहीत होतं. पण डॉ. हेडगेवार यांना सर्व ओळखत होते. जेव्हा संघाची सुरुवात झाली, तेव्हा स्वयंसेवकही संघाची ओळख बनले. आज 100 वर्ष झाली, स्वयंसेवक हेच संघाची खरी ओळख आहेत, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.

मी एक प्रचारक

वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तराची असते. मानवी गुण आणि योग्यता यात भिन्नता असते. प्रत्येकात आपलं एक वैशिष्ट्ये असतं. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे त्याचं समर्पण. मी स्वत: एक प्रचारक आहे. मी प्रचारकांना पाहिलं आहे आणि सातत्याने त्यांना पाहत असतो. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत सामान्य झाली आहे, असं ते म्हणाले.

जगाची आपल्यावर नजर

स्वयंसेवकाच्या जीवनात अहंकार किंवा स्वतःसाठी काही अपेक्षा नसते. समाजाचं जितकं भलं होईल तेवढं तो करतो. विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे, असं जीवन स्वयंसेवक जगत असतो. असे काम करताना अनेक संकट येतात. मोह देण्यात येतो. मात्र आज स्वतःला स्वयंसेवक सांगणाऱ्या 70 ते 75 लाख स्वयंसेवकांमध्ये 4 हजार लोक स्वतःची अपेक्षा सोडून देशाच्या भविष्यासाठी जगतात. माझ्यासारखा 70 वर्षे पार केलेला व्यक्ती सहनशील बनूच शकतो. तेव्हा राग आणि ताकत नसते, असं त्यांनी सांगितलं.

मराठीत एक म्हण आहे. लग्नाच्या मांडवात मुंज उरकून घेणे. मात्र इथे उलट होतं. मुंज आधी होते. असं जीवन जगण्याची आज गरज आहे. याबाबतीत जगाची नजर आपल्या देशावर टिकून आहे. जगात कोणत्याही पटलावर आपल्याला ही स्थिती दिसेल, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us