नागपूरच्या हॉटेलमध्ये घडला अनर्थ! एकाच रात्रीत मुलगा, सून अन् सासूचं आयुष्य कसं संपल?

नागपूरमधील एका हॉटेलमध्ये बेंगळुरूच्या तरुणाने पत्नीच्या निधनानंतर आत्महत्या केली, तर त्याच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. हनिमूनवरून परतल्यानंतर सुरू झालेल्या वादाचा हा करुण अंत वाचा सविस्तर.

नागपूरच्या हॉटेलमध्ये घडला अनर्थ! एकाच रात्रीत मुलगा, सून अन् सासूचं आयुष्य कसं संपल?
nagpur crime
| Updated on: Dec 30, 2025 | 9:42 AM

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बेंगळुरुतील एका नवविवाहित तरुणाने नागपूरमधील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज शिवण्णा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मरताना पाहून त्याच्या आईनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?

सूरज आणि त्याची आई जयंती हे बेंगळुरूहून नागपूरला आले होते. वर्धा रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला होता. शनिवारी सूरजने हॉटेलच्या खोलीतील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच वेळी त्याच्या आईनेही टोकाचे पाऊल उचलले. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत सूरजचा मृत्यू झाला होता. कौटुंबिक वादामुळे ही घटना घडली.

सूरज आणि गणवी यांचा विवाह २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात झाला होता. लग्नानंतर हे जोडपे हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र, तिथेच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर त्यांना हनिमून अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. परतल्यानंतर गणवीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या लोकांवर अनेक आरोप केले. सासरच्या मंडळींकडून तिचा सतत अपमान आणि छळ केला जात होता, असा आरोप गणवीच्या माहेरच्यांनी केला होता. मानसिक त्रासाला कंटाळून गणवीने मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर ती व्हेंटिलेटरवर होती आणि गुरुवारी तिचा मृत्यू झाला.

गणवीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बेंगळुरूमध्ये दाखल केला. संतप्त नातेवाईकांनी सूरजच्या घरासमोर निदर्शने करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. या सामाजिक दबावाला आणि कायदेशीर कचाट्याला घाबरून सूरज आपल्या आईसह नागपूरला निघून आला होता. नागपूरला आल्यानंतर त्याने हॉटेलमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

सूरजचा भाऊ संजय शिवण्णा याने या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना दिली. सूरजची आई जयंती यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. नागपूर पोलीस सध्या बेंगळुरू पोलिसांच्या संपर्कात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. एका सुखी संसाराचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.