Nanded | नांदेडात गावांसह शहरातही पाणीच पाणी, मनपाची बेफिकिरी, श्रावस्ती भागात माणसं अर्धी बुडाली, हजार नागरिक अडकले

| Updated on: Jul 13, 2022 | 2:30 PM

Nanded Rain | नांदेड महापालिकेच्या हद्दीतील श्रावस्ती, सादतनगर, तेहरा नगर या भागात जवळपास 1000 पेक्षा जास्त नागरिक अडकून पडले आहेत. महापालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Nanded | नांदेडात गावांसह शहरातही पाणीच पाणी, मनपाची बेफिकिरी, श्रावस्ती भागात माणसं अर्धी बुडाली, हजार नागरिक अडकले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेडः जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे . पावसामुळे नांदेड (Nanded rain) शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय . चार दिवसापूर्वी श्रावस्तीनगर भागात पाणी साचले होते . आज पुन्हा या भागात तीच परिस्थिती निर्माण झाली . श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरा नगर या भागात कमरेइतकं पाणी साचलंय. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसानदेखील झालं आहे. सध्या या भागात एक हजाराहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नांदेड महापालिकेचे (Nanded municipal corporation) बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी (Rainy season) पाण्याचा निचरा होण्याचं व्यवस्थापन न केल्यानं श्रावस्ती भागात अशा प्रकारे पाणी शिरलं आहे. नागरिकांची घरं आणि संसार तर पाण्याखाली गेलीच आहेत. माणसांच्या कमरेपर्यंत पाणी आल्यानं त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना बाहेर काढलं जात आहे.

1000 पेक्षा जास्त नागरिक अडकले

नांदेड महापालिकेच्या हद्दीतील श्रावस्ती, सादतनगर, तेहरा नगर या भागात जवळपास 1000 पेक्षा जास्त नागरिक अडकून पडले आहेत. महापालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील काही दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिलेला असतांना सखल भागातील नागरिकाना वेळीच सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासन बेफिकीर राहिली. आज पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.

जिल्ह्यात पाचव्या दिवशीही सूर्यदर्शन नाही…

नांदेडमध्ये आज सलग पाचव्या दिवशी देखील सूर्यदर्शन झाले नसून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नांदेड शहरात चोहीकडे पाणी साचलेले आहे. तसेच अर्धापुर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो हेक्टर जमिनिसह रस्ते पाण्याखाली गेलेत. विष्णुपुरी बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी सह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहतायत. नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी आणि आसना ह्या तिन्ही नद्या तुडुंब भरल्यामुळे नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटलाय. सलग पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.