‘तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलताय, आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण?’ नारायण राणेंचं प्रकाश महाजनांना प्रत्युत्तर

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी, 'नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही. राणे यांना वैचारिक खोली तर नाहीये अशी टीका केली होती. याला उत्तर देताना नारायण राणेंनी आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलताय, आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नारायण राणेंचं प्रकाश महाजनांना प्रत्युत्तर
Narayan Rane
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 09, 2025 | 7:57 PM

राज्यात सध्या मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे. यामुळे महाराष्ट्राला फायदा होईल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी याचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही असं विधान केले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याबाबत बोलताना, एका पक्षाचे 20 आमदार आहेत तर दुसऱ्या पक्षाचे शून्य आमदार आहेत. त्यांची भरपूर ताकद आहे. आम्ही आता एवढे घाबरलो आहोत की आम्हाला झोप लागत नाहीये. आमचं कसं होणार या प्रश्नाचा विचार करून आमच्या अंगाला घाम फुटतो आहे, अशी उपरोधिक टीका मंत्री नितेश राणे यांनी केली होती.

नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी चोख उत्तर दिले होते. महाजन यांनी म्हटले होते की, नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही. राणे यांना वैचारिक खोली तर नाहीये. त्यांची वैचारिक उंची म्हणजे ते उभे राहिले तर लवंगेएवढी होते आणि ते बसले तर विलायची एवढी होते. त्यामुळे अशा माणसाला कशाला गांभीर्याने घ्यायचं नितेश राणे हे त्यांच्या वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदीप्रमाणे सल्ले देत असतात, असं महाजन यांनी म्हटलं होत. आता महाजनांच्या या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश महाजन लायकीपेक्षा जास्त बोलत आहेत – नारायण राणे

नारायण राणेंनी म्हटले की, ‘प्रकाश महाजन लायकीपेक्षा जास्त बोलत आहेत. प्रकाश महाजनांनी जे अकलेचे तारे तोडले आणि राज ठाकरे आणि माझ्याबद्दल जे बोलले त्याबद्दल मला काहीही बोलाचये नाही. प्रकाश महाजन कोण आहेत? राजकारण, समाजकारण, विधायक क्षेत्रात त्यांचे योगदान काय आहे? कुठल्या पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा वापर करावा एवढी तुमची कुवत नाही.’

मची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण?

पुढे बोलताना नारायण राणेंनी म्हटले की, मंत्री नितेश राणेंनी आपली वैचारिकता, बुद्धीमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे. आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? आमची उंची जनतेन ठरवलेली आहे. नितेश राणे तीनवेळा जनतेतून निवडून आले आहेत. आपण किती वेळा निवडूण आलात? आपण राणेंच्या रस्त्यात आला आहात तर तुम्हाला योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरूर करेन असं उत्तर नारायण राणेंनी महाजनांना दिले आहे.