भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी 16 वर्षांपासून…; धक्कादायक माहिती उघड

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात १६ वर्षांपासून माहेरच्या लोकांशी संपर्कहीन असल्याची धक्कादायक माहिती SIT तपासात समोर आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी 16 वर्षांपासून...; धक्कादायक माहिती उघड
ashok kharat
| Updated on: Apr 03, 2026 | 9:01 AM

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरातबद्दल विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती खळबळजनक माहिती लागली आहे. कल्पना खरातने गेल्या १६ वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी सर्व नातेसंबंध तोडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वडील आणि भावाच्या निधनासारख्या अत्यंत दुःखद प्रसंगीही तिने घराची पायरी चढली नसल्याची तपासात उघड झाले आहे.

सध्या पोलिसांसह एसआयटीकडून अशोक खरातसंबंधी वेगाने चौकशी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक खरातच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरु आहे. एसआयटीने सिन्नर तालुक्यातील पाडळी या कल्पना खरातच्या माहेरी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. कल्पनाचे माहेरचे कुटुंब अत्यंत गरीब असून ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, अशोक खरातच्या संपर्कात आल्यापासून कल्पनाने आपल्या कुटुंबाशी असलेले रक्ताचे नाते पूर्णपणे तोडले होते. माहेरची परिस्थिती हलाखीची असूनही तिने कधीही त्यांची साधी विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वडिल आणि भावाच्या निधनालाही गैरहजर

या प्रकरणाच्या तपासातील सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे गेल्या १६ वर्षांच्या काळात कल्पनाच्या वडिलांचे आणि भावाचे निधन झाले. कोणत्याही व्यक्तीसाठी हे अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंग असतात. मात्र कल्पना या दोन्ही प्रसंगी माहेरी गेली नाही. कुटुंबाशी तिचा संपर्क इतका तुटला आहे की, तिच्या माहेरच्या लोकांसाठी ती जणू अस्तित्वातच नव्हती. ही माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान अशोक खरातच्या भोंदूपणा आणि फसवणुकीच्या व्यवसायात कल्पनाचा सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ती सध्या फरार असल्याने तिचा शोध घेणे हे एसआयटीसाठी सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. मात्र, तिने स्वतःच्या कुटुंबाशीही कोणतेही संबंध ठेवले नसल्याने तिचा ठावठिकाणा शोधण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ती अशोकच्या दबावाखाली होती की ती स्वतः या कटात जाणीवपूर्वक सामील होती, हे तिच्या अटकेनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या पोलीस विविध पातळ्यांवर तिचा शोध घेत असून, या काळ्या साम्राज्यातील अनेक गुपिते तिच्या अटकेनंतर बाहेर येण्याची शक्यता आहे.

Follow Us