Nashik News : आधी 8 महिन्यांची मुलगी बेपत्ता, संशयिताची आत्महत्या, आता आजोबाही गायब, नांदगाव प्रकरणाचं गूढ वाढलं !

नाशिकच्या नांदगाव येथील आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका संशयिताने आत्महत्या केल्याने गूढ वाढले. आता मुलीचे आजोबाही गायब झाल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. अपहरणाचा संशय असून, पोलीस कसून तपास करत आहेत, मात्र चिमुकलीचा शोध अद्याप लागलेला नाही. हे प्रकरण आता अधिकच जटिल बनले आहे.

Nashik News : आधी 8 महिन्यांची मुलगी बेपत्ता, संशयिताची आत्महत्या, आता आजोबाही गायब, नांदगाव प्रकरणाचं गूढ वाढलं !
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 19, 2026 | 4:42 PM

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातील बाभुळवाडी येथून अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 17 तारखेच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चिमुकलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकली बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली.

प्रकरणात नवा ट्विस्ट

या घटनेला अनेक तास उलटूनही चिमुकलीचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह परिसरात चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. बेपत्ता मुलीच्या आई-वडिलांनीच तिच्या आजोबांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा आणखी बदलली आहे. यापूर्वी या प्रकरणात एका इसमाची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती. मात्र, चौकशीनंतर संबंधित इसमाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली. मुलीचे आजोबाही बेपत्ता असल्याने संशय अधिक गडद झाला असून या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं.

कसून तपास सुरू

दरम्यान, बेपत्ता चिमुकलीच्या शोधासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. त्या चिमुकलीचं नेमकं काय झालं, तिचं अपहरण झालं आहे का, ती कोणाच्या ताब्यात आहे का किंवा या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, या सर्व शक्यता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. संबंधित व्यक्तींची चौकशी तसेच उपलब्ध माहिती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. आजोबांचा आणि आठ महिन्यांच्या चिमुकलीचा लवकरात लवकर शोध घेणं आणि या घटनेमागील नेमकं सत्य समोर आणणं, हे नांदगाव पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचा उलगडा कसा होतो आणि चिमुकलीचा शोध कधी लागतो, याकडे नांदगावसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us