
नाशिक : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीचे वारं सुरू आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापलं आहे. उन्हाचा पारा एकीकडे वाढत असतांना दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापल्याचे बघायला मिळत आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली बाजार समितीच्या निवडणूकीत अधिकच रंगत पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे आमदार दिलीप बनकर यांच्या समर्थकांनी स्थापन केलेल्या सहा विविध कार्यकारी संस्था अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी याबाबत आक्षेप घेतला होता. त्यात हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले होते.
उच्च न्यायालयात पोहचलेल्या या प्रकरणातबाबत नुकतीच एक माहिती समोर आली आहे. अपात्रतेच्या कारवाईबाबत निफाड तालुक्याचे आमदार तथा पिंपळगाव बाजार समितीचे माजी चेअरमन दिलीप बनकर यांनी धाव घेतली होती, त्यावर उच्च न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे.
दिलीप बनकर यांच्या समर्थकांच्या असलेल्या 06 विविध कार्यकारी संस्थाच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 28 एप्रिल पर्यंत पुढं ढकलला आहे. त्यामुळे दिलीप बनकर यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.
निर्णय पुढे ढकलला गेल्यानं माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांच्या सदस्यांना मतदान करता येणार नाहीये. त्यामुळे बनकर यांचे जवळपास 72 मते कमी होणार आहे.
उच्च न्यायालयाने सहा संस्थांचा अपात्रतेचा निर्णय पुढं ढकलला गेल्यानं आमदार दिलीप बनकर यांचे समर्थक असलेले 72 मतदार बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाऊ शकणार नाहीये.
कांद्यासह, टोमॅटो, द्राक्ष आणि फळभाज्यांची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलमध्ये ही लढत होत आहे.
बाजार समितीच्या हद्दीत असलेल्या 6 विविध कार्यकारी संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून पुढील सुनावणीत काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आशिया खंडात आर्थिक ताकदीने अग्रेसर असलेल्या पिंपळगाव बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी आजी माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे बनकर गड राखणार की अनिल कदम सत्ता खेचून आणतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.