उत्तर महाराष्ट्रात मोठी लढत, पिंपळगाव बाजार समितीत बनकर की कदम ?

पिंपळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत (Pimpalgaon Bajar Samiti Election 2021)

उत्तर महाराष्ट्रात मोठी लढत, पिंपळगाव बाजार समितीत बनकर की कदम ?

पिंपळगाव (नाशिक) : कोरोना संकट नियंत्रणात आल्यानंतर राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची धुमाळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा आपल्याला बघायला मिळाला. आता आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगूल लवकरच वाजणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीला कोरोना संकटामुळे 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र, 31 मार्चनंतर बाजार समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. या धुराळ्याआधीच पिंपळगावमध्ये राजकीय डावपेचांना सुरुवात झाल्याचं चित्र आहे. यावेळी सत्ताधारी आमदार आणि माजी आमदार यांनी मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे (Pimpalgaon Bajar Samiti Election 2021).

पिंपळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दिलीप बनकर यांनी दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा पराभव केला. हा पराभव कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आमदारकी हातातून निसटल्याने अनिल कदम यांनी आपला मोर्चा बाजार समितीच्या निवडणुकीकडे वळवला आहे. त्यांच्या गटाला बळकट करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधनी करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कदम यांना या निवडणुकीत भास्कर बनकर आणि मोरे कुटुंबाची खंबीर साथ असणार आहे. त्यामुळे पिंपळगावात आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई बघायला मिळणार आहे.

पिंपळगाव बाजार समितीवर गेल्या 20 वर्षांपासून दिलीप बनकर यांचं वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांना पराभव मिळाल्याने त्यांनी बाजार समितीमधील दिलीप बनकर यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या गटाला सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी कदम प्रयत्न करणार आहेत (Pimpalgaon Bajar Samiti Election 2021).

पिंपळगाव बाजार समितीचा इतिहास काय?

पिंपळगाव बाजार समिती 1996 आधी लासलगाव बाजार समितीचाच एक भाग होती. या बाजार समितीला लासलगाव बाजार समितीची उप बाजार समिती मानलं जायचं. मात्र, 1996 मध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार कल्याणराव पाटील आणि आमदार रावसाहेब कदम यांनी या बाजार समितीचं विभाजन केलं. या विभाजनानंतर बाजार समितीच्या विकासात दिलीप बनकर यांचा खारीचा वाटा आहे.

गेल्या बाजार समितीत निवडणुकीत बनकर आणि कदम यांच्यात राजकीय मांडवली

पिंपळगाव बाजार समितीची 200 कोटी रुपयांची स्थावर, रोख मालमत्ता आहे. या बाजार समितीचं 15 कोटी रुपयांचं उत्पन्न आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या चाव्या आपल्या खिशात राहावे यासाठी बनकर आणि कदम गटात चढाओढ सुरु झाली आहे. बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत दोघी गटांमध्ये राजकीय मांडवली झाली होती. बाजार समितीच्या 17 जागांपैकी 13 जागा या बनकर गटाला तर 4 जागा कदम गटाला देण्याचं दोघी गटातून निश्चित झालं होतं. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, या निवडणुकीत कदम यांनी तयारी सुरु केल्याने दोघी गटांमध्ये संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं?

बाजार समितीला शेतकरी गटाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आलेले प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी आणि हमाल-कामगार वर्ग यांचे प्रतिनिधी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करतात.

हेही वाचा : राष्ट्रवादी आमदाराच्या पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा, परस्पर कर्ज काढल्याचा आरोप

Published On - 3:35 pm, Sat, 23 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI