
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करुन देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असतो. म्हाडा हा एक राज्य सरकारचा विभाग आहे. मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी म्हाडाकडून घरांसाठी लॉटरी काढली जाते. सध्याच्या परिस्थितीत म्हाडाच्या घराच्या किंमती सुद्धा प्रचंड आहेत. पण खासगी विकासकाच्या तुलनेत थोड्या कमी आहेत. आता म्हाडाच्या नाशिक विभागाकडून विविध भागातील 402 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढणार आहे.
चुंचाळे, पाथार्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारा या भागात ही घरं आहेत. 14 लाखापासून 36 लाखापर्यंत या घराच्या किंमती आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी सोमवारी वांद्रे येथील मुख्यालयात लॉटरीसाठी नोंदणी प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्ज मागवण्याच्या प्रोसेचा शुभारंभ केला. परवडणाऱ्या दरातील घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने काढलेली ही चौथी लॉटरी आहे. ज्या घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येत आहे, ती अजून बांधलेली नाहीत. लॉटरी विजेत्यांना पाच हप्त्यांमध्ये घराचे पैसे द्यावे लागतील.
अल्प उत्पन्न गटासाठी किती घरं?
अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 293 घरं आहेत. यात चुंचाळे शिवारा येथे 138 घरे, पाथार्डी शिवारा येथे 30, मखमलाबाद शिवारा येथील 48, आडगाव शिवारा येथे 77 घरं आहेत. मध्ये उत्पन्न गटाच्या विक्रीसाठी 109 घरं आहेत. सातपूर शिवारामध्ये 40, पाथार्डी शिवारात 35 आणि आडवाग शिवरात 34 घरं आहेत.
काय पुरावा द्यावा लागेल?
अर्जदाराला 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंतचा उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल. या पुराव्यामध्ये इन्कम टॅक्स रिर्टन किंवा तहसील कार्यालयातून उत्पन्नाच प्रमाणपत्र द्यावं लागेल.
पुण्यात तुफान प्रतिसाद
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने 4,186 घरांसाठी सोडत काढली. त्याला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सोडतीसाठी आतापर्यंत 1 लाख 82 हजार 781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1 लाख 33 हजार 885 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. एका घरासाठी सरासरी 43 जणांनी अर्ज केले आहेत. 27 आणि 28 ऑक्टोंबरला अर्ज भरताना काही टेक्निकल अडचणी आलेल्या. त्यामुळे अर्ज स्वीकारायला मुदतवाढ दिलेली.