Panjabrao Dakh: चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, पंजाबराव डख यांच्या अडचणी वाढल्या, राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतला मोठा निर्णय
पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज सांगत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यांच्या चुकीच्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल भीमराव धोंडे यांनी उपस्थित केला आहे.

NCP Leader Bhimrao Dhonde On Panjabrao Dakh: महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक म्हणून पंजाबराव डख यांच्या अंदाजाची नेहमीच चर्चा असते. पाऊस पाण्याचा अंदाज सांगत ते शेतकऱ्यांनी काय करावे? काय करु नये याबाबत ते माहिती देत असतात. मात्र पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज अनेकदा चुकल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या चुकलेल्या अंदाजांमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकाही होत असते. अशातच आता पंजाबराव डख यांच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट पोलिसात धाव घेतली आहे.
पंजाबराव डख यांच्याविरोधात तक्रार!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हवामान अभ्यासर पंजाबराव डख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज सांगत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यांच्या चुकीच्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल भीमराव धोंडे यांनी उपस्थित केला आहे.
हवामान अंदाजाच्या नावाखाली पंजाबराव डख यांनी केलेल्या भाकितांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होऊन अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा कायम सुरू राहील, असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते भीमराव धोंडे यांनी दिला आहे. आता पोलीस या तक्रारीवर नेमकी काय भूमिका घेणार? पंजाबराव डख यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.