आता फक्त राज ठाकरेच… रस्त्यावरील पांंढऱ्या पट्टीच्या वादावर जैन मुनी निलेशचंद्र यांचं मोठं विधान, संदीप देशपांडेंना थेट आव्हान!

मराठी आणि मारवाडी असा विवाद करणारा निर्माण करणारा मास्टरमाइंड कोण आहे. राज ठाकरे यांच्याशिवाय हे प्रकरण दुसरे कोणीही मिटवू शकत नाही, असं निलेशचंद्र मुनी म्हणाले.

आता फक्त राज ठाकरेच... रस्त्यावरील पांंढऱ्या पट्टीच्या वादावर जैन मुनी निलेशचंद्र यांचं मोठं विधान, संदीप देशपांडेंना थेट आव्हान!
nilesh chandra muni and raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 4:25 PM

सध्या मुंबईत रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या आणि या पांढऱ्या पट्ट्यांचे जैन धर्मियांशी असलेला संबंध राज्यबरात चर्चेचा विषय ठरतो आहे. जैन साधूसंत जेव्हा अनुयायांच्या घरी येतात, त्यावेळी साधूसंतांच्या येण्याच्या मार्गावर पांढऱ्या पट्ट्या आखल्या जातात. पायाखाली जीव-जंतू मरू नयेत, तसेच साधू-संतांच्या पायांना उन लागू नये यासाठी या पट्ट्या आखल्याचे सांगितले जाते. याच पांढऱ्या पट्ट्यांवर मुंबईत अनेक ठिकाणी आक्षेप घेण्यात येत आहे. मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील हा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुनी निलेशचंद्र हे अशिक्षित आहेत, असा हल्लाबोल देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या याच टीकेवर आता निलेशचंद्र यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळतो की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निलेशचंद्र मुनी नेमकं काय म्हणाले?

मला हे बोलायचं नव्हतं पण बोलावं लागत आहे. कारण आता हा विषय माझ्यावर आला आहे. संदीप देशांपांडे साहेबांनी मला बोलवावे. मी किती शिकलेलो आहे, किती नाही ते सांगतो. मी जैन समाजाला सांगितलं आहे की शांतता ठेवा. प्रत्युत्तर देऊ नका, असा पलटवार मुनी निलेशचंद्र यांनी केला आहे.

या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे?

तसेच मराठी आणि मारवाडी असा विवाद करणारा निर्माण करणारा मास्टरमाइंड कोण आहे. राज ठाकरे यांच्याशिवाय हे प्रकरण दुसरे कोणीही मिटवू शकत नाही. या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे हे राज साहेबांना माहिती आहे, असे मतही मुनी निलेशचंद्र यांनी व्यक्त केले. तसेच जैन जिहाद असा आरोप केला जात आहे. यावर जैन समाजाचे मंत्री का बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले होते?

मी शिकलेल्या लोकांना उत्तर देतो. निलेशचंद्र वगैरे दुसरीपर्यंतही शिकलेले असतील, असे मला वाटत नाही. पांढऱ्या पट्टीवर शेवाळ होत नाहीत, असं ते सांगत होते. मला त्यांची शाळा कोणती आहे, ते कुठल्या शाळेत शिकवतात हे मला जाणून घ्यायचे आहे, असा हल्लाबोल संदीप देशापांडे यांनी केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us