भंडाऱ्यात जाऊबाई जोरात! सरपंचपदासाठी एकाच कुटुंबातील दोन महिला मैदानात; नातेवाईक मात्र पेचात

या निवडणुकीत कोणीही निवडून येऊ द्या, पण आम्ही दोघीही एकत्रित आहोत. त्यामुळे आमच्या नातेसंबंधावर काहीच परिणाम होणार नाही, असं दोघीही सांगत आहेत.

भंडाऱ्यात जाऊबाई जोरात! सरपंचपदासाठी एकाच कुटुंबातील दोन महिला मैदानात; नातेवाईक मात्र पेचात
भंडाऱ्यात जाऊबाई जोरात
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 15, 2022 | 8:51 AM

भंडारा: घराच्या कारभाराची किल्ली आपल्याच हाती राहावी म्हणून जावा जावांमध्ये नेहमीच चढाओढ लागलेली पाहायला मिळते. त्यावरून दोघींमध्ये वादही होतो. सत्तेची हीच चढाओढ आता घरातून थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत पोहोचली आहे. भंडाऱ्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत दोन जावा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. सरपंचपदासाठी या दोन्ही जावांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकाच कुटुंबातील दोन जावा सरपंचपदासाठी एकमेकांच्या विरुद्ध लढत आहे. भंडारा तालुक्याच्या दिघोरी (आमगांव)मध्ये ही लढत पाहायला मिळत आहे. आता एकाच कुटुंबात सरपंचपदाच्या दोन प्रतिस्पर्धी महिला उमदेवार असल्याने कोणाला मत द्यायचे यामुळे नातेवाईकही पेचात पडले आहेत. आता दिघोरी गावात जाऊ व्हर्सेस जाऊ निवडणूक होत असल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे.

भंडारा जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी 305 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मात्र भंडारा तालुक्याच्या दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे दोन जावांची सरपंचपदासाठी सुरू असलेली टक्कर. या ग्रामपंचायत निवडणुकीत भावकीतच रणसंग्राम रंगलेला पाहायला मिळत आहे.

या गावातील नागदेवे कुटुंबातील दोन जावा सरपंचपदासाठी निवडणुक लढवत आहेत. मोठी जाऊ वीणा नागदेवे या आपल्या पॅनलकडून सरपंचपदासाठी लढत आहेत. तर त्यांची छोटी जाऊ छोट्या जाऊ पायल नागदेवे अपक्ष उमेदवार म्हणून सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

या निवडणुकीत कोणीही निवडून येऊ द्या, पण आम्ही दोघीही एकत्रित आहोत. त्यामुळे आमच्या नातेसंबंधावर काहीच परिणाम होणार नाही, असं दोघीही सांगत आहेत.

मात्र, दोघींनी आपणच निवडून यावं म्हणून जोरदार प्रचार सुरू केला असून दोघी एकमेकींना काँटे की टक्कर देणार असल्याचं चित्रं दिसत आहे. मात्र, या दोघींपैकी कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार हे येत्या 18 डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.