Palghar News : पुराच्या पाण्यातून गाडी चालवणे अंगलट आले, पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून गेली !

राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहने,माणसं वाहून जाण्याच्या घटना घ़त आहेत.

Palghar News : पुराच्या पाण्यातून गाडी चालवणे अंगलट आले, पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून गेली !
पुराच्या पाण्यात कार वाहून गेली
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 20, 2023 | 11:43 AM

जितेंद्र पाटील, TV9 मराठी, पालघर / 20 जुलै 2023 : पुराच्या पाण्यातून गाडी चालवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात वाहून गेली. वानगाव चिंचणी मार्गावरील कलोली येथे ही घटना घडली. कारमध्ये एकूण तीन जण होते. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील दोघांना वाचवण्यात यश मिळवले. मात्र एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. किरण संखे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बाबा जोशी आणि गणेश संखे अशी सुखरुप वाचलेल्यांची नावे आहेत. पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून आज पावसाचा ऑरेंज ॲलर्टही जिल्ह्यात जाहीर करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

किरण संखे, बाबा जोशी आणि गणेश संखे हे तिघे चिंचणीवरून वाणगावच्या दिशेने कारने घरी चालले होते. यावेळी वानगाव चिंचणी मार्गावर कलोली येथे रस्त्यावरुन पुराचे पाणी वाहत होते. पहाटेची वेळ असल्याने काळोखात कारचालकाला रस्त्यावरील पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे कार पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागली. स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेत बाबा जोशी आणि गणेश संखे यांना कारमधून सुखरूप बाहेर काढले. मात्र किरण संखे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

मृतदेह शोधण्यास यश

स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने किरण संखे यांचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. मृतदेह सध्या तारापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. सध्या मुसळधार पाऊस असल्याने नद्या, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. गावातील रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. यामुळे प्रशासनाकडून वारंवार घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात येत आहेत.