माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीनं केली बत्तकम्माची पूजा, कसा असतो हा सण?

| Updated on: Oct 05, 2022 | 3:52 PM

या बत्तकम्मा डोक्यावर घेऊन पायदळ प्रवास करतात. नदीत या बत्तकम्मा विसर्जन केलं जातं.

माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीनं केली बत्तकम्माची पूजा, कसा असतो हा सण?
माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीनं केली बत्तकम्माची पूजा
Image Credit source: t v 9
Follow us on

इरफान मोहम्मद, Tv9 मराठी, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात बत्तकम्मा हा सण मोठ्या उत्साहात गावोगावी साजरा केला जातो. तेलंगणा राज्याची संस्कृती असलेला बत्तकम्मा गडचिरोली जिल्ह्यात महिला भक्तांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. महिला भक्त या बत्तकम्मात नऊ दिवस पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी व सणाच्या आदल्या दिवशी या बत्तकम्माचं विसर्जन केलं जातं. बत्तकम्मा देवी हा एक गौरीसारखा प्रकार आहे. वेगवेगळ्या फुलांनी व पाने तयार केलेल्या बत्तकम्माची नऊ दिवस महिला भक्त भक्तिभावाने पूजा करतात.

नदीत केलं जातं विसर्जन

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग असलेल्या सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी या तालुक्यात महिला भक्त उत्साहाने हा सण साजरा करतात. प्रत्येक आपल्या गावात आणि शहरात हे बत्तकमा एक ठिकाणी ठेवतात. सर्व महिला भक्त दोन ते तीन तास त्यांची पूजा करतात. नंतर या बत्तकम्मा डोक्यावर घेऊन पायदळ प्रवास करतात. नदीत या बत्तकम्मा विसर्जन केलं जातं.

भाग्यश्रीताईंनी केली बत्तकम्माची पूजा

मोठ्या भक्तिभावाने बत्तकम्माचा महिला भक्तांकडून साजरा केला गेला. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या यांनीही बत्तकम्माची पूजा केली. भाग्यश्री हलगेकर यांनी बत्तकम्माची पूजा केली. बत्तकम्मा गौरीचा प्रकार आहे. तेलंगणा राज्याची संस्कृती असलेला हा सण आहे. आम्ही महाराष्ट्रात साजरा करतो, असं महिलांनी सांगितलं.

कामगार वर्ग सहभागी

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात तेलगु समाज बांधवांनी बत्तकम्मा सण उत्साहात साजरा केला. गौरीच्या प्रथेप्रमाणे सजवलेले घट व शेकडो दीप सोबत घेत हा उत्सव साजरा करतात. आपल्या परिवाराच्या समृद्धीसाठी व भरभराटीसाठी माता गौरीकडं प्रार्थना केली जाते.

चंद्रपूर शहरात कोळसा खाण वसाहत परिसरात मोठ्या संख्येने तेलगु भाषिक कामगार वर्ग वास्तव्याला आहे. एका मोठ्या मैदानात बत्तकम्मा महोत्सवाचे आयोजन करून यात सर्वांना सहभागी करून घेण्यात आले.

याप्रसंगी मंडपाच्या मधोमध आकर्षक फुलांनी सजविलेले घट आणि त्याभोवती फेर धरून नाचणाऱ्या महिला यामुळे वातावरण भक्तिमय झाले. शेकडो महिला-मुली व तेलगू भाषिक नागरिकांनी बत्तकम्मा महोत्सवात उत्साही सहभाग घेतला.