
डॉली चहावाला गाजत असताना आता धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील या चहावाल्याची चर्चा रंगली आहे. हा चहावाला शेतात जाऊन शेतकऱ्यांना, मजूरांना चहा देतो.

महादेव माळी यांनी चहा व्यवसायाची ही भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. गरमा गरम चहा थेट शेताच्या बांधावर पोहचविण्याचे काम ते करतात. पंचक्रोशीत ते एकदम लोकप्रिय आहेत.

कष्टकऱ्यांना, शेत मजूरांना थेट बांधावर चहा देण्याचे काम ते करतात. त्यांना केवळ एक फोन केला की त्या व्यक्तीचा आवाज ओळखून चहा देण्यासाठी त्या शेतात पोहचतात.

या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागावली जात आहे. हा चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो.

महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात.

ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात.

माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक कॉल येतात. विशेष म्हणजे माळी यांना या आवाजाची इतकी ओळख झाली आहे की, कोणत्या शेतातून आणि कोणी फोन केला हे ते केवळ आवाजावरुन ओळखतात.