पनवेल-बदलापूर प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार; गेमचेंजर एक्स्प्रेस वेच्या बोगद्याचं काम कुठंपर्यंत आलं?
मुंबई-बडोदा एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. या मार्गावरील पनवेल-बदलापूरला जोडणाऱ्या बोगद्यामुळे प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे.

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. पनवेल-बदलापूर दरम्यान असलेला चार किलो मीटर लांबीचा बोगदा तयार झाला आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. यामुळे आता बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. या मार्गामुळे पनवेल आणि बदलापुरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-बडोदा एक्स्प्रेसमुळे मुंबई दिल्ला प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे. सध्या रस्ते मार्गाने दिल्लीला जाण्यासाठी 22 ते 24 तासांचा वेळ लागतो. परंतु नव्या मार्गामुळे 12 ते 14 तासांचा अवधी लागणार आहे. या मार्गासाठी दोन महिन्यात युद्धपातळीवर काम करणे सुरू आहे. या एक्स्प्रेस वेवरील बोगद्याचे काम डिसेंबरअखेर किंवा नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
एक्स्प्रेस वेवरील पनवेल-बदलापूर मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच माथेरान डोंगरामध्येही 4 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आलाय. एक बोगदा वाहतुकीसाठी तयार झालाय. तर दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू आहे. पुढील दोन महिन्यात दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होईल. या एस्प्रेस वेमुळे मुंबईहून दिल्लीला जाण्याचा वेळ देखील वाचेल. अवघ्या 12 ते 14 तासांत दिल्ली गाठता येणार आहे. तसेच प्रवासी, वाहनधाराकांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे. जेएनपीटी बंदराला देखील फायदा होईल. सध्या कंटेनर हे नवी मुंबई, ठाणे, भिवंडी मार्गे जातात. दोन महिन्यांनी ही वाहतूक नवीन बोगद्यातून वळवली जाणार आहे. यामुळे पनवेल, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे,भिवंडी भागात राहणाऱ्यांची वाहतूक कोंडीत सुटका होईल.
या मार्गाने देशभरात मालाची आयात-निर्यात जलदगतीने पोहोचण्यास मदत होणार आहे. हा मार्ग सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. या मार्गातील ‘पॅकेज 17’ चा बोगदा एक महत्त्वाचा आहे. चार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा बोगदा रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला थेट जोडला जाणार आहे. या बोगद्यामुळे अवजड वाहतूक या मार्गावरून सुरळीतपणे होणार आहे.