राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विश्वासात न घेतल्याने खासदार सुप्रिया सुळे नाराज असल्याची चर्चा आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेतील बॅनर्सवर त्यांचे फोटो नसणे, हेही नाराजीचे कारण मानले जात आहे. यासंदर्भात २६ तारखेला जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये अंतर्गत कलहाची चर्चा सध्या जोर धरत आहे. आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावरून पक्षातील वरिष्ठ नेते नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः खासदार सुप्रिया सुळे या मोर्चाबाबत विश्वासात न घेतल्याने संतप्त असल्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, रोहित पवारांनी मोर्चाची घोषणा करण्यापूर्वी आणि नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबतही वरिष्ठांना माहिती दिली नव्हती.
नागपूरमधील पत्रकार परिषदेच्या बॅनरवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो नसल्यानेही नाराजीचा सूर उमटत आहे. या कथित नाराजीमुळे सुप्रिया सुळे यांनी सलील देशमुख यांना फोन केल्याचेही बोलले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, २६ तारखेला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) च्या जिल्हाध्यक्षांची मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्चाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित पवारांच्या डी-लिमिटेशन विधेयकाला विरोध आणि सुप्रिया सुळे यांचा त्याला पाठिंबा, यामुळेही पक्षातील मतभेद समोर येत आहेत.
Published on: Nov 24, 2026 12:51 PM
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..

