AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 24, 2026 | 12:13 PM
Share

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. चाळीसगावची जागा बिनविरोध न होण्यामागे माजी खासदार उन्मेश पाटील जबाबदार असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला. पालकमंत्र्यांच्या सूचना धुडकावून पाटील यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले नाही. यानंतर, पक्षविरोधी भूमिकेमुळे राहुल पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील महायुतीची जागा बिनविरोध न होण्यामागे पक्षाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांचे आडमुठे धोरण जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे चाळीसगाव तालुकाप्रमुख राहुल पाटील यांनी केला होता.

राहुल पाटील यांनी म्हटले होते की, जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली असताना, चाळीसगावची जागाही बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र, उन्मेश पाटील यांच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश देऊनही संबंधित उमेदवारांनी माघार घेतली नाही, असा दावा राहुल पाटील यांनी केला. उन्मेश पाटील हे पक्ष एक खासगी कंपनी असल्याप्रमाणे चालवत असून जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या आरोपानंतर, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे पत्र जारी केले. पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाबाबत यापूर्वी समज देऊनही सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल पाटील यांची प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

Published on: Nov 24, 2026 12:13 PM

Follow Us