कुणाचा बाप, कुणाची बहीण तर कुणाची सून जिंकली… कार्यकर्ता हरला, सर्व पक्षीय घराणेशाही जिंकली; या निवडणुकीत आजी माजी आमदारांचा दबदबा; निकाल आला
Parbhani DCC Bank Election : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात जिल्ह्यातील परिवार सत्ता पुन्हा एकदा उघडकीस पडला असून, आजी माजी आमदार आणि प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील अनेक जण बिनविरोध निवडून आले आहेत.

राजकारण आणि घराणेशाही हे नातं खूप जुनं आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात जिल्ह्यातील परिवार सत्ता पुन्हा एकदा उघडकीस पडला असून, आजी माजी आमदार आणि प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील अनेक जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. विशेष म्हणजे जवळपास सर्वच पक्षातील नेते या घराणेशाही मध्ये आघाडीवर आहेत.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजले असून 19जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक लागल्यापासून नेत्यांचे खंदे समर्थक असलेले अनेक जण तयारीला लागले होते. परंतु या सर्वांचाच अपेक्षाभंग झाला असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला परिवार सत्ताकारण पॅटर्न जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील समोर आला आहे. आजी माजी आमदारांनी आपल्या कुटुंबीयांची वर्णी बँकेवर लावली असून 21 पैकी 13 संचालक बिनविरोध आले आहेत.
मेघना बोर्डीकर आघाडीवर
यामध्ये परभणीच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आघाडीवर असून त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर, बहीण भावना बोर्डीकर आणि त्या स्वतः बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसचे माजी मंत्री आणि सध्या भाजपचे नेते असलेल्या सुरेश वरपूडकर यांनी देखील हाच कित्ता गिरवत त्यांनी त्यांची सून प्रेरणा वरपूडकर यांना बिनविरोध निवडून आणलं आहे.
हिंगोली येथील राजेश गोरेगावकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये परिवार वादाचा कित्ता गिरवलाय. ते स्वतः आणि त्यांचा मुलगा दिग्विजय पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी देखील आपला छोटा भाऊ मेहराज खान यांना बँकेवर बिनविरोध निवडून आणले आणि ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत.
कार्यकर्त्यांवर सतरंज्या उचलण्याची वेळ
विशेष बाब म्हणजे या पूर्वी झालेल्या निवडणुका आणि राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक या निवडणुकीत मात्र आपल्या कुटुंबातील नव्याने राजकारणत येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यामुळे मोठ्या निवडणुकीत आपल्या नेत्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांच्या पदरी या छोट्या निवडणुकीतही सतरंजी उचलण्या शिवाय काहीही पडलं नाही. बाकी उरलेल्या 8 जगासाठी आता 19जुलै मतदान होणार असुन या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.