Lata Mangeshkar : दिग्दर्शकानं नाकारलेलं लता दीदींचं गाणं, नंतर पश्चातापानं स्वतःलाच मारली चप्पल, अभिनेत्यानं केली मध्यस्थी, तेच गाणं ठरलं अजरामर
Lata Mangeshkar Song : लता मंगेशकर यांनी आजवर अनेक गाजलेल्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. मात्र, एक गाणं असं आहे ज्याला दिग्दर्शकाने नकार दिलेला, पण, आज तेच गाणं सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशी काही गाणी आहेत, जी काळाच्या कितीही पुढे गेली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. त्यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘लग जा गले’. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने सजलेलं हे गाणं आजही ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येतं. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वो कौन थी?’ या चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री साधना आणि मनोज कुमार झळकले होते. संगीतकार मदन मोहन आणि गीतकार राजा मेहदी अली खान यांनी या गाण्याला अजरामर बनवलं. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, हे लोकप्रिय गाणं जवळपास चित्रपटातून बाद होणार होतं? सुरुवातीला दिग्दर्शक राज खोसला यांना या गाण्याची चाल पसंत पडली नव्हती. पण अभिनेता मनोज कुमार यांनी वेळीच मध्यस्थी केली आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक अजरामर गाणं मिळालं.
‘लग जा गले’ या गाण्याची चाल संगीतकार मदन मोहन यांनी अतिशय मेहनतीनं तयार केली होती. त्यांना खात्री होती की, हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करेल. मात्र, जेव्हा त्यांनी ही चाल दिग्दर्शक राज खोसला यांना ऐकवली, तेव्हा त्यांना ती फारशी आवडली नाही. ‘वो कौन थी?’ हा रहस्यमय चित्रपट असल्यामुळे त्यांना या गाण्यात अपेक्षित असलेली गूढता जाणवली नव्हती. राज खोसला यांनी गाणं नाकारल्यामुळे मदन मोहन प्रचंड नाराज झाले. आपली आवडती रचना चित्रपटातून बाद होण्याची शक्यता त्यांना सहन होत नव्हती. अखेर त्यांनी चित्रपटाचे प्रमुख अभिनेते मनोज कुमार यांची मदत घेण्याचं ठरवलं.
मनोज कुमारांनी वाचवलं अजरामर गाणं!
मदन मोहन यांनी मनोज कुमार यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांनी मनोज कुमार यांना गाणं ऐकण्याची विनंती केली. मनोज कुमार यांना ही चाल पहिल्याच ऐकण्यात प्रचंड आवडली. त्यांना या गाण्यातील क्षमता लक्षात आली आणि त्यांनी राज खोसला यांना पुन्हा एकदा गाणं ऐकण्याची विनंती केली. यानंतर मनोज कुमार यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा गाणं सादर करण्यात आलं. यावेळी मात्र राज खोसला यांना ही चाल प्रचंड आवडली. आपण काही दिवसांपूर्वी हेच गाणं नाकारलं होतं, याची जाणीव झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. मनोज कुमार यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, गाणं ऐकल्यानंतर राज खोसला यांनी स्वतःच्या चुकीबद्दल इतका पश्चात्ताप व्यक्त केला की, त्यांनी चप्पल काढून स्वतःलाच मारायला सुरुवात केली. हा किस्सा मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
लता मंगेशकरांसाठीही सोपं नव्हतं गाणं!
या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र, हे गाणं, गाणं त्यांच्यासाठीही सोपं नव्हतं. मदन मोहन यांनी गाण्यात अनेक जागा, मुरक्या आणि स्वरांमधील वेगवेगळे बदल सुचवले होते. त्यातील काही बदल लतादीदींनीही स्वतःच्या कल्पकतेनं जोडले होते. ‘लग जा गले’ हे गाणं केवळ ‘वो कौन थी?’ चित्रपटापुरतं मर्यादित राहिलं नाही. अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. विविध चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्येही या गाण्याचा वापर करण्यात आला आहे.
