साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार

| Updated on: Nov 27, 2021 | 10:14 AM

साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. त्यासाठी उस्मानाबादचे साहित्य संमेलनाकडे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. येथे स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते.

साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये येत्या 3 ते 5 डिसेंबरमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Sahitya Sammelan) यथासांग राजकीय कार्यक्रम झाला असून, उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत राजकीय नेत्यांनी हे संमेलन जणू हायजॅक केल्याचे दिसत आहे. त्यामुळे साहित्यकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेषतः साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील याबद्दल स्पष्ट बोलत नसले तरी ते नाराज असल्याचे समजते.

मुख्यमंत्री ऑनलाईन

नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन अगोदरच नाना कारणांनी वादात आहे. त्यात आता या राजकीय मसल्याची भर पडली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुख्यमंत्री या संमेलनाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचे समजते. साहित्य संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची हजेरी असणार आहे. सोबतच संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत. एकंदर काय तर तीन दिवस राजकीय सरबराईत पार पाडले जातील. त्यामुळे साहित्यकांमध्ये नाराजी असल्याचे समजते.

उस्मानाबादला चोख पालन

साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. त्यासाठी उस्मानाबादचे साहित्य संमेलनाकडे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. येथे स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, नाशिकच्या समंलेनाचे उद्घाटन ते समारोपाचा नारळ राजकीय व्यक्तीच फोडणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आहे.

अन् नावे घुसवली

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी राजकीय व्यक्तींना शक्यतो टाळा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, निमंत्रकांनी त्याला फाटा देत पत्रिकेमध्ये राजकीय व्यक्तींची नावे घुसवली. या साऱ्या नावांना साहित्य महामंडळाची मान्यता असल्याचे सांगितले. विशेषतः साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः भुजबळ. या साऱ्यामुळे ठाले-पाटील यांची गोची झाली आहे.

पाटलांवरून नाराजीचा सूर

साहित्य संमेलनाचे उद्घाटन 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर , मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. मात्र, गीतकार जावेद अख्तर यांच्या भूमिका पाहता त्यांच्या नावाला हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. शिवाय साहित्यिक विश्वास पाटील यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना का बोलावले, असा सूर साहित्यिकांमध्ये आहे.

इतर बातम्याः

कामाला लागा, छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश; आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जाण्याचा दावा

नाशिककरांनो शेतजमीन विकायची आहे, शासनाची एक भन्नाट योजना, काय आहे घ्या जाणून