पुण्यात संशयित बॅग आढळली; संपूर्ण परिसरात एकच खळबळ, पोलीस घटनास्थळी धावले
पुण्यातील 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच भीती पसरली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी धाव घेत परिसरात रिकामा केला.

पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील 15 ऑगस्ट चौक येथे संशयित बॅग आढळली आहे. संशयित बॅग आढळल्यानंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब स्कॉड तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपासणी सुरू केली आहे. तसेच त्यांनी सर्व परिसर मोकळा केला आहे.
पुण्यासह राज्यातील न्यायलये बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्या होत्या. त्यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. त्यात काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात एक गोळीबाराची घटना घडली. पुण्यात सर्वसामान्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. धमकी सत्रानंतर आता पुण्यात संशयित बॅग आढळली. त्यानंतर सर्वांची एकच धावाधाव झाली. या घटनेनंतर पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.
तृप्ती देसाई यांच्याकडून संताप व्यक्त
तृप्ती देसाई म्हणाल्या, पुणे तिथे उणे असं म्हटलं जातं. परंतु पुणे आता कायद्याचं शहर आहे की, गन्हेगारांचं शहर आहे. हे समजत नाही. दोन दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. त्यात पुण्यात कोयता गँगचा वावर वाढला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. आज 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळते. बॅग संशयित आहे की नाही, परंतु भीतीचं वातावरण सर्व ठिकाणी आहे.
‘बॅग सापडल्यानंतर कोर्ट रिकामं करावं लागतं. रस्ता रिकामा करावा लागतो. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं लक्ष आहे की नाही. पोलीस आयुक्त चांगले काम करत होते. आता कुठेतरी गुन्हेगारी वाढत आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांची बदली होत नाही. गुन्हेगारी वाढू लागली, खरतंर पुणे सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक जण पुण्याला प्राधान्य देतात. अशा घटनेने गृहमंत्र्याचं अपयश दिसत आहे. पोलीस आयुक्त आणि कर्मचारी हे गुन्हेगारांना जवळ करतात. प्रोत्साहन मिळत असल्याने गुंड हे पोलिसांना घाबरत नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या तृत्पी देसाई यांनी केली.