
Nilesh Ghaywal House raid : कोथरुडमधील गोळीबारानंतरच्या मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. यानंतर आता पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याभोवती पुणे पोलिसांकडून कारवाईचा फास मोठ्या प्रमाणात आवळला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या पुण्यातील घरांवर मोठी छापेमारी केली जात आहे. यात अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात केलेल्या छापेमारीदरम्यान त्यांना बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. याशिवाय, पोलिसांच्या हाती घायवळच्या विविध मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. यामध्ये सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश आहे. याबरोबरच, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील काही महत्त्वाच्या फाइल्सदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तसेच दुसरीकडे, पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या बेकायदा मालमत्तांवरही कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र पाठवले आहे. यात निलेश घायवळच्या नावावरील अनधिकृत बांधकामे आणि मालमत्तांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राच्या आधारावर पुणे महानगरपालिका आता सक्रिय झाली आहे. यानुसार निलेश घायवळच्या अनधिकृत मालमत्तांवर कारवाई करण्याची तयारी केली जात आहे. मनपाचे पथक लवकरच निलेश घायवळच्या अनधिकृत मालमत्ता आणि थकीत कर असलेल्या मालमत्ता सीझ (जप्त) करण्याच्या कारवाईला सुरुवात करणार आहे.
दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून निलेश घायवळने विदेशात पलायन केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्याची बँक खाती आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडींवरून, पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी निलेश घायवळविरोधात अत्यंत कठोर कारवाईचा बडगा उगारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.