फडणवीस दिल्लीत जावे ही एकनाथ शिंदेंची इच्छा… संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

संजय राऊतांनी दावा केला आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार आहेत, ही केवळ शिंदेंची नव्हे तर महाराष्ट्राचीही इच्छा आहे. राऊतांनी मोदी-फडणवीस चर्चेची गुप्त माहिती असल्याचा दावा करत, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपमध्ये मंत्री राजीनामा देण्यास नकार देत असल्याने बंडाळी असल्याचे म्हटले.

फडणवीस दिल्लीत जावे ही एकनाथ शिंदेंची इच्छा... संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 11:17 AM

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फडणवीस यांनी दिल्लीत जावे आणि सर्वोच्चपदी जावे ही फक्त एकनाथ शिंदेंची इच्छा नाहीये, तर महाराष्ट्राची इच्छा आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मोदी आणि फडणवीस यांची चर्चा काय झाली हे मी सांगू शकतो. माझे इंटेलिजन्स मजबूत आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. राऊत कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस रोज दिल्लीत का जात आहेत? 72 तासाने दिल्लीत का जावं लागतं? महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे. उठसूट दिल्लीत जाऊन काय चर्चा करता? काय चर्चा करता हे मी सांगू शकतो. त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला. ते त्यांनी ठरवलं होतं का? ते नाही ठरवू शकत. त्यामुळे त्यांना दिल्लीत मोदी मंत्रिमंडळात जावं लागणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

चार मंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार

राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मोदींना मंत्रिमंडळात फेरबदलकरायचे आहेत. ते करू शकत नाही. त्यांच्या पक्षात बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. फेरबदल करताना नेहमी राजीनामे घेतले जातात. पण चार ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हे जुने मंत्री आहेत. ओरिजनल भाजपचे नेते आहेत. पादरे पावटे नाहीत. आता आलेले नेते नाहीत. हे चारही मंत्री आधी शाहांचा राजीनामा घ्या म्हणत आहेत. त्यामुळे फेरबदल झाला नाही, असं दावा राऊत यांनी केला.

तुमच्या मनात फडणवीस असेल तर…

नव्या फेरबदलात उपपंतप्रधानपद असावं. संघाच्या विचाराला मानणारा उपपंतप्रधान असावा. तो पंतप्रधानांचा वारसदार असेल. अमित शाह नाही, अशी संघाची भूमिका आहे. भाजपच्या अंतर्गत या घडामोडी घडत आहेत. मी कुणाचं नाव घेतलं नाही. तुमच्या मनात फडणवीस असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

भागवतांना विचार मांडू द्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत विरोध होत आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोहन भागवत हे त्यांचे विचार मांडत आहेत. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे त्यांना त्यांचे विचार मांडू द्यावेत, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us