Video : चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यास रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण

Pune News : पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण कोणी सामान्य व्यक्तीने नाही तर वकिलाने केली आहे.

Video : चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यास रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jun 22, 2023 | 4:26 PM

पुणे : पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्या जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्ह्याची जबाबदारी असते, कायदा अन् सुव्यवस्था राखण्याची महत्वाची भूमिका असते, त्यांच्याच कार्यालयात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. ही मारहाण एका शेतकऱ्यास झाली आहे. अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत ही मारहाण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला कायद्याची सर्व माहिती आहे, त्याच्याकडूनच ही मारहाण झाली आहे. एका वकिलाकडून शेतकऱ्यास मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी शेतकरी अन् वकील यांच्यांत तुफान हाणामारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावरच हा गोंधळ झाला आहे. या ठिकाणी शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शेतकऱ्याला ही मारहाण झाली आहे. शेतकरी राजेंद्र दिनकर चव्हाण यांना एका वकिलककडून मारहाण झाली आहे. विरोधी पक्षकाराच्या वकिलाने आपणास दमदाटी केल्याचा आरोप शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी केला आहे तर आपण स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलाने केला आहे.

परिसरात गोंधळ

हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना मारहाण सुरु असताना जमाव जमला होता. हा जमाव दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचे भांडण सोडवले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे की नाही? यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही. परंतु या प्रकाराची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच रंगली होती. एखादा वकील जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण कशी करु शकतो? असा प्रश्न सुज्ञ व्यक्तींकडून उपस्थित होत होतो.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात असे प्रकार होणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.