रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ

लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांकडे ओबीसी दाखला असल्याचा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सुप्रिया सुळेंपाठोपाठ आता रोहित पवारांच्या दाखल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. १ सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्धारही हाकेंनी व्यक्त केला.

रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ
raohit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 11:26 AM

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी असल्याचा दाखला असल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंबाबत अनावधानाने बोलल्याचं सांगून दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडलेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट रोहित पवार यांच्याबाबतचा एक नवा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. रोहित पवार यांच्याकडे ओबीसीचा दाखला असल्याचा गौप्यस्फोट लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांचा ओबीसीचा दाखला आहे किंवा नाही हे मला माहित नाही. मात्र रोहित पवार यांचा ओबीसी दाखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उगाच नाकाने वांगी सोलू नये. रोहित पवार यांचा दाखला आहे म्हटल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा देखील ओबीसींचा दाखला निघेल, असा दावाच लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

आम्हाला जेलमध्ये टाका, मुंबईत धडकणारच

येत्या 1 सप्टेंबर रोजी ओबीसींचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. त्यावरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला मोर्चाच्या परवानगीसाठी निवेदन दिलं आहे. परंतु पोलीस कधीच परवानगी देत नाही. आम्हाला मोर्चाचा अनुभव मोठा आहे. सरकारला वाटत असेल ओबीसींना आंदोलन करू द्यायचं नाही तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकावं. आमचं आंदोलन होणारच आहे. आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच, असा इशाराच हाके यांनी दिला आहे.

विखेंपासून दानवेंपर्यंत…

मनोज जरांगे यांनी गरजू लोकांसाठी मराठा आरक्षण सुरू केले. पण याचा लाभ विखे पाटील, रोहित पवार आणि दानवेंपासून आणि अनेकांनी त्याचा लाभ घेतलाय. ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम 2004 पासून सुरू आहे. परंतु ते ऑथराईज करण्याचे काम मनोज जरांगे सारख्या बावळट माणसाने केलंय, अशी टीका त्यांनी केली.

जरांगे मुंबईला धडकणार

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटीत आंदोलन सुरू झालं आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विशेष म्हणजे जरांगे यांचं हे शेवटचं आणि निर्णयाक आंदोलन आहे. अंतरवली सराटीतून जरांगे हे मुंबईला येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनीही मुंबईला मोर्चा नेण्याचा आग्रह केला आहे. तसेच जरांगे यांनीही मुंबईला धडकण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us