अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पत्नीसाठी सुरू होता नव्या घराचा शोध… कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नवविवाहित महेश कुंभार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या १७ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या महेश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड मनपा आणि संबंधित कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत दुर्घटनेस जबाबदार धरले आहे. कुटुंबीय आर्थिक मदतीऐवजी न्याय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पत्नीसाठी सुरू होता नव्या घराचा शोध... कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
mahesh kumbhar
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 9:57 PM

पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महेश कुंभार यांच्या कुटुंबाचा आक्रोश आता समोर आला आहे. अवघ्या 17 दिवसांपूर्वी संसाराला सुरुवात केलेल्या महेश यांचा कचऱ्याच्या डोंगराखाली जीव गेला. तर आता कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संबंधित व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. महेश यांचे भाऊ संतोष कुंभार यांनी दुर्घटनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कंपनी व्यवस्थापनाला जबाबदार धरत, ही दुर्घटना टाळता आली असती असा आरोप केला आहे.

महेश यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि पत्नीला पुण्यात आणण्यासाठी ते घर शोधत होते, अशी हळवी आठवणही संतोष कुंभार यांनी सांगितली. तर महेश यांच्या भावजय आणि इतर कुटुंबीयांनी आर्थिक मदतीने आमचा माणूस परत येणार आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. महेश यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पालिकाच जबाबदार

कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे बिल्डिंग पडली. त्यात 20 – 22 जण अडकले होते. त्यात माझा भाऊ सुद्धा महेश कुंभार होता. जे नऊ लोक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्याही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. असं कोणाच्याही आयुष्यात होऊ नये, असंच वाटतं. याला संपूर्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे. कंपनीचे मॅनेजमेंट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हे सगळे जबाबदार आहेत. ती इमारत सुद्धा अनधिकृत असल्याची माहिती समजली आहे. दोन मजले अनधिकृत बांधल्याची माहिती आहे, असं संतोष कुंभार म्हणाले.

त्याचं वय 32 होतं…

आता काही पैसे जाहीर केले आहेत. राज्य सरकार सुद्धा पाच लाख देणार आहे. मात्र त्यांचं वय आता 32 वर्ष होतं. महेशचं शिक्षण MBA (HR) झालं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये. तो मागच्या वर्षी 25 मार्चला HR Executive म्हणून जॉईन झाला होता. त्याच्यासाठी मी तीन ते चार महिन्यांपासून जॉब सर्च करत होतो. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. त्याच्या दोन दिवस अगोदर मी मेसेज टाकला होता, तुझा रिझ्युमे अपडेट कर, अपडेट करून मला पाठव. मला इतर ठिकाणी पाठवायचा आहे. मी त्याच्यासाठी जॉब बघत होतो. तो आमच्यापासून दूर होता. दोन-तीन महिन्यांनी एकदा येत होता. तो आमच्या सोबत असेल तर चांगलं होईल म्हणून मी त्याच्यासाठी जॉब बघत होतो, असंही त्यांनी सांगितलं.

रिसेप्शन बाकी होतं…

महेशच्या लग्नाला सतरा-अठरा दिवस झाले होते फक्त. अजून कोर्ट मॅरेज करायचं होतं. कोर्ट मॅरेज एका दिवसात होत नाही, म्हणून डेट घ्यायची होती. परंतु आम्ही रिसेप्शन टाईप केलं होतं. शंभर – सव्वाशे लोकांत रिसेप्शन होणार होतं, अशी माहिती त्यांनी दिली.

आता सुट्टी घेता येत नाही

यावेळी महेश यांची भावजय अनिता कुंभार यांनीही प्रतिक्रिया दिली. माझं त्यांच्यासोबत शेवटचं बोलणं झालं होतं. मुलाचा बर्थडे होता. त्यांना मी बोलावलं होतं. मात्र, आता सुट्टी घेता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. कितीही दुखलं तरी ते कंपनीत जायचे. एकही सुट्टी घ्यायचे नाही. त्यांची अपेक्षा ही होती की हातात चांगलं पेमेंट आलं पाहिजे. पेमेंट नसेल तर घर कसं चालणार? लग्न झाल्यानंतर आठ दिवस झाले नव्हते. तो एवढा खुश होता. तिथे जाऊन रूम बघितली. त्यांनी दुसऱ्या रूम मालकाला सांगितलं, “आता मी बॅचलरमध्ये राहणार नाही, फॅमिली घेऊन येतोय.”, असं अनिता म्हणाल्या.

माणूस भेटणार आहे का?

महेश यांची दुसरी भावजय बसू कुंभार यांनीही दीराच्या आठवणी सांगितल्या. त्यांचा स्वभाव चांगला होता. मला भाऊ नाही, तेच माझे भाऊ होते. आता ते नाहीत. ते लोक त्यांना आणून देणार आहेत का? आता म्हणत आहेत, एवढे पैसे देतो, तेवढे पैसे देतो. आता एवढे पैसे देऊन आपली माणसं भेटणार आहेत का? तो डोंगर पडणारच होता. त्यांना समजलं होतं तर त्यांनी कंपनी बंद ठेवायला पाहिजे होती. आता आपल्याला आपला माणूस पाहिजे. आता तो भेटत नाही, आम्ही काय करावं?, असा सवाल बसू यांनी केला.

Follow Us