सुरक्षितेकडे दुर्लक्ष करुन मेट्रोचे काम?, आता होणार स्ट्रक्चरल ऑडिट

| Updated on: Apr 18, 2023 | 3:57 PM

पुणे शहरातील बारा किलोमीटर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या मेट्रो मार्गावरील चार स्थानकांची पाहणी तज्ज्ञ असलेल्या चौघांनी केली. त्यात त्रुटी असल्याचा दावा या समितीने केला. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सुरक्षितेकडे दुर्लक्ष करुन मेट्रोचे काम?, आता होणार स्ट्रक्चरल ऑडिट
File Photo
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहरातील बारा किलोमीटर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन झाले होते. पौड व कर्वे रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटर लांबीची मेट्रो धावत आहे. या मेट्रो मार्गावरील चार स्थानकांची पाहणी तज्ज्ञ असलेल्या चौघांनी केली, तेव्हा त्यांना अनेक धक्कादायक त्रुटी असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने सात दिवसांत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

काय दिले आदेश

पुण्यात मेट्रोस्थानकांचे सात दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) वकिलांनी सांगितले की, पुणे शहरातील वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावरील स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल सात दिवसांत सादर करण्यात येईल. यानंतर उच्च न्यायालयाने याबाबतची जनहित याचिका निकाली काढली.

हे सुद्धा वाचा

काय आहे आरोप

वनाज, आनंदनगर, नळस्टॉप, गरवारे कॉलेज या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून काम करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती नेमून संपूर्ण मेट्रो मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे,अशी जनहित याचिका दाखल होती.

गेल्या वर्षी उदघाटन

वनाज- गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गाचे आणि त्यावरील चार स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सहा मार्च रोजी उद्घाटन झाले होते. या स्थानकांच्या कामात त्रुटी असून प्रवाशांसाठी ते असुरक्षित आहे, असे तज्ज्ञांच्या एका गटाचे म्हणणे आहे. यामुळे तज्ज्ञांच्या एका गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान सीओपीकडून आता मेट्रो मार्गाचे आणि चारही स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे.

कोणी केली होती पाहणी

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व स्थापत्य अभियंता शिरीष खसबरकर, कोकण रेल्वे महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या चार स्थानकांची पाहणी केली. त्यात त्रुटी असल्याचे म्हटले होते.