शव अर्धवट जळाले, मशीनचा फ्यूज उडाला, रात्री 11.30 वाजता नेत्याला स्मशानभूमीतून फोन

| Updated on: Feb 23, 2023 | 2:36 PM

शवदाहिनीची दुरुस्ती करणाऱ्यांनी मी सकाळी येईन, आता येऊ शकत नाही असे म्हणून हात वर केले होते. मग ठेकेदार आणि मेंटेनन्सवाल्यांना वसंत मोरे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

शव अर्धवट जळाले, मशीनचा फ्यूज उडाला, रात्री 11.30 वाजता नेत्याला स्मशानभूमीतून फोन
शवदाहिनी
Image Credit source: social media
Follow us on

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटमधून सोशल मीडियाची ‘पावर’ त्यांनी दाखवून दिली आहे. नेमके काय झाले तर वसंत मोरे यांच्या मोबाईलवर रात्री साडेअकरा वाजता फोन आला. फोन करणारा म्हणाला, ‘साहेब, मी कात्रज स्मशानभूमीतून बोलतोय. मृतदेह अर्धवट जळाला आहे, अन् अचानक शवदाहिनीचा फ्यूज उडाला. मशीन बंद झाली आहे. दोन तास झाले तरी दुरुस्ती करणारे येत नाही. ‘ या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांना धक्काच बसला होता. ते अस्वस्थ झाले होते. यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने मनसे नेते वसंत मोरे यांना फोन लावला होता. कारण त्यांने वसंत मोरे यांच्याबद्दल खूप काही ऐकले होते.

मोरे यांनी काय केले


शवदाहिनीची दुरुस्ती करणाऱ्यांनी मी सकाळी येईन, आता येऊ शकत नाही असे म्हणून हात वर केले होते. मग ठेकेदार आणि मेंटेनन्सवाल्यांना वसंत मोरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. कारण मशीनमधील मृतदेह अर्धवट जळाला होता.

अधिकारी अन् ठेकेदारांना फोन

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वसंत मोरे यांनीही तत्परता दाखवत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. श्रीनिवास कंदुल यांना विषय सांगितला. दोन्हीही ठेकेदारांना सांगितले जर २ तासांत मृतदेहाचा अंत्यसंस्कार पूर्ण झाला नाही तर मी लाईव्ह येईन, मग पुढे जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार..

मग लागले कामाला

वसंत मोरे यांच्या फोननंतर अधिकारी व कंत्राटदार तात्काळ कामाला लागले आणि स्मशानभूमीवर पोहोचले. विद्युत स्मशानभूमीची दुरुस्ती तासाभरात पूर्ण केली. अन् मृतदेहावर अंतिमसंस्कार झाले. याबद्दल मृतांच्या नातेवाईकांनी वसंत मोरे यांचे आभार मानले. सोशल मीडियाच्या बळावर वसंत मोरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

पुन्हा आले चर्चेत

वसंत मोरे नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. मागच्यावेळी त्यांनी एका टपरीवर चक्क चहा बनवला होता. त्याचा व्हिडीओही शेअर केला होता. त्यामुळे वसंत मोरे यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा झाली होती. पुण्यात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही महिला कोयता घेऊन गवत कापायला जात असतानाचे फोटो वसंत मोरे यांनी शेअर केले होते. त्याचीही अशीच चर्चा रंगली होती.