मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, सातारा- रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, हातनूर धरणाचे दरवाजे उघडले

monsoon rain in maharashtra: राज्यात यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला. यंदा मान्सूनची वाटचाल अंदमान निकोबारपासून चांगली राहिली. त्या ठिकाणी २१ मे ऐवजी १९ मे रोजी मान्सून आला. त्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे रोजी मान्सून दाखल झाला. कोकणात ६ जून रोजी वेळेपूर्वीच मान्सून आला.

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, सातारा- रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, हातनूर धरणाचे दरवाजे उघडले
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला आहे.
| Updated on: Jun 24, 2024 | 12:26 PM

महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला आहे. मान्सूनच्या पावसाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात जोर धरला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. परंतु आता सात दिवसांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्रात पाऊस सुरू सक्रीय झाला आहे.

राज्यात यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला. यंदा मान्सूनची वाटचाल अंदमान निकोबारपासून चांगली राहिली. त्या ठिकाणी २१ मे ऐवजी १९ मे रोजी मान्सून आला. त्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे रोजी मान्सून दाखल झाला. कोकणात ६ जून रोजी वेळेपूर्वीच मान्सून आला. त्यानंतर ८ जून रोजी पुणे आणि ९ जून रोजी मुंबईसह, ठाणे या भागात मान्सून दाखल झाला आहे. परंतु विदर्भात जाण्यापूर्वी मान्सून रेंगाळला. २१ जून रोजी विदर्भात मान्सून दाखल झाला. आता गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस सुरु आहे.

शेवटचा आठवडा पावसाचा

बंगाल उपसागरात मान्सूनच्या पावसाला अनुकूल बदल झाले आहे. यामुळे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील हातनूरचे दरवाजे उघडले

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील हातनूर धरणाचे चार दरवाजे 0.5 उघडण्यात आले आहे. हातनूर धरणातून 4097 क्यूसेक्सने तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. धरणात 53.20% जलसाठा शिल्लक आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने हातनूर धरणात पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली. यामुळे चार दरवाजे उघडण्यात आले. हातनूर धरणातील पाणलोट क्षेत्रात 177 मिलिमीटर पाऊस ची नोंद करण्यात आली.

गावात घुसले पाणी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील दराने रोहाने या गावात जोरदार पाऊस झाला.
मुसळधार पावसामुळे गावात घुसले पाणी घुसले. नाल्याला आलेल्या पुरामुळे संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या. दराने रोहणे गावात नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

संभाजीनगरमध्ये मुसळधार

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील साई धानोरा या गावात रविवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गावातील शेत शिवाराला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते. शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणीही निर्माण झाल्या आहेत.