Raju Shetty: येताना चालत येतील, पण जाताना…; राजू शेट्टींचा महायुतीला थेट इशारा, गोकुळच्या रणांगणात संघर्षाची ठिणगी!
Raju Shetti Targets Devendra Fadnavis Over Gokul: गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आत येतील, पण बाहेर जाऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार, महायुती आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्या होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत शासन नियुक्त संचालकांना थेट इशारा दिला आहे.
शासन नियुक्त संचालक उद्याच्या अध्यक्ष निवडीच्या सभेला आले तर ते आत येतील. मात्र बाहेर जाऊ शकणार नाहीत. येताना चालत येतील, पण जाताना खांद्यावरून जातील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. उद्या गोकुळ कार्यालयावर घेराव घालायचा का, असा सवाल करत त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले. महायुतीचे नेते आपली माणसे आणि कार्यकर्ते आणणार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत, तुम्ही तुमचे लोक आणा, आम्हीही आमची माणसे आणतो. एकदा काय ते होऊन जाऊ दे, असे आव्हान त्यांनी दिले.
गोकुळ हा कोल्हापूरच्या जनतेच्या मालकीचा आहे, कोणाच्या बापाचा नाही, असे म्हणत शेट्टी यांनी गुजरातमधून गोकुळवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. गुजरात ही आजची ईस्ट इंडिया कंपनी आहे, महाराष्ट्र तिची वसाहत आणि देवेंद्र फडणवीस हे त्या कंपनीचे व्हाईसरॉय आहेत, अशी जहरी टीका त्यांनी केली. नाशिकचे पाणी गुजरातला वळवण्याचा प्रयत्न, हत्ती पळवण्याचा प्रयत्न आणि शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
गोकुळच्या निवडणुकीनंतर चार शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयाने या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ड्रोनद्वारे आंदोलनाचे दृश्य मागवून उपस्थितांची संख्या पाहावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणारे आहोत. मात्र न्यायालयाने चुकीचा निर्णय दिल्यास तो खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
गोकुळमध्ये सहावा संचालक नियुक्त करण्यासाठी अध्यादेश काढावा आणि अमित शाह यांनाच संचालक करून अध्यक्ष करावे, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. आम्ही ईडीला घाबरत नाही, असे स्पष्ट करत उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संघर्षाचा इशाराही दिला. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.