मंत्री झालो तर एकटा दहा मंत्र्यांचं काम करेल, रवी राणांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील इच्छा

Ravi Rana : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून, संधी मिळाल्यास आपण एकटेच दहा मंत्र्यांचे काम करू शकतो, असे म्हटले आहे.

मंत्री झालो तर एकटा दहा मंत्र्यांचं काम करेल, रवी राणांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील इच्छा
Ravi Rana
Image Credit source: Google
| Updated on: Apr 28, 2026 | 7:47 PM

गेल्या काही काळात राज्यातील राजकारणात मोठा बदल घडलेला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला होता. या विजयामुळे महायुतीचे 235 आमदार विधानसभेत पोहोचले होते. त्यामुळे मंत्रि‍पदासाठी अनेकांमध्ये चुरस पहायला मिळाली. आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे काही वरिष्ठ नेत्यांनाही मंत्रि‍पदापासून दूर रहावे लागले होते. यात अमरावतीच्या बडनेराचे भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा यांचाही समावेश आहे. अशातच आता रवी राणा यांनी मंत्रि‍पदाची इच्चा बोलून दाखवली आहे. रवी राणा यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

रवी राणांनी मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी म्हटले की, ‘अनेक पदे येतात, पदे जातात. कधी खुर्चीवर बसावं लागतं तर कधी चटईवर पण बसावं लागतं. चटईवर बसायची ज्याची तयारी असते तो माणूस कायमस्वरूपी खुर्चीवर बसत असतो. मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मुख्यमंत्र्यांची कृपा झाली तर त्यांची कृपा होणार आहे. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल. जेव्हा मी असे वक्तव्य करतो तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून मला फोन येतात थांब रे बाबा थांब असं म्हणतात. अशाप्रकारे रवी राणा यांनी पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

CM फडणवीस यांच्या जवळचे आमदार

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजपच्या पाठिंब्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील खराटे यांचा पराभव केला होता. रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार मानले जातात. 2019 साली शिवसेना आणि भाजपच्या संघर्षत रवी राणा यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा आंदोलन केले होते, त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. तब्बल पंधरा दिवस हे दांपत्य जेलमध्ये होते.

आगामी काळात मंत्रिपद मिळण्याची शक्यता

2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. या सरकारला रवी राणा यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा विधानसभा मतदार संघात विकासकामे केली होती. त्यानंतर 2024 साली राणा यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आता आगामी काळात जर मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर रवी राणा यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Follow Us