Dheeraj Deshmukh: रितेश देशमुखच्या भावाचा मोठा विजय; लातूर जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांनी मारली बाजी
Dhiraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

Dhiraj Deshmukh: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते आणि अभिनेता रितेश देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा त्यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडीमुळे लातूर जिल्हा बँकेवरील धीरज देशमुख यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने दमदार कामगिरी केली होती. एकूण 19 जागांपैकी सहकार पॅनेलने तब्बल 14 जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निकालातून सहकार पॅनेलला संचालक मंडळात स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीतही धीरज देशमुख यांचं पारडं जड मानलं जात होतं.
आता नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने बँकेच्या कारभारात सातत्य राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. निवडणुकीतील यशानंतर अध्यक्षपदही कायम राखण्यात धीरज देशमुख यांना यश आलं आहे. दरम्यान, बँकेच्या उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. अविनाश जाधव हे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू आहेत. त्यामुळे या निवडीकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वात अध्यक्षपद धीरज देशमुख यांच्याकडे, तर उपाध्यक्षपद अविनाश जाधव यांच्याकडे असणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण भागातील शेतकरी, सहकारी संस्था आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या आर्थिक संस्था मानल्या जातात. पीक कर्ज, शेतीसाठी आर्थिक मदत, सहकारी संस्थांना वित्तपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळासमोरही बँकेचा कारभार अधिक सक्षम करण्याचं आव्हान असेल.
एकूणच, निवडणुकीत 14 जागा जिंकत सहकार पॅनेलने मिळवलेलं बहुमत आणि त्यानंतर धीरज देशमुख यांची दुसऱ्यांदा झालेली अध्यक्षपदी निवड, यामुळे लातूर जिल्हा बँकेत त्यांचं नेतत्व कायम राहणार आहे.