देशभक्ती जगविणे हा संघाचा ठेका नाही तो इतरांनी सुद्धा पुढे नेला पाहिजे, मोहन भागवत यांनी ठणकावले

देशभक्ती जागवण्याचा ठेका केवळ संघाचा नाही, तो इतरांनीही पुढे नेला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरात बोलत होते.

देशभक्ती जगविणे हा संघाचा ठेका नाही तो इतरांनी सुद्धा पुढे नेला पाहिजे, मोहन भागवत यांनी ठणकावले
| Updated on: Sep 29, 2025 | 11:55 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघगीत लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभक्तीच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशभक्तीच्या प्रसाराबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि स्पष्ट मत मांडले. देशभक्ती जागवण्याचा ठेका केवळ संघाचा नाही, तो इतरांनीही पुढे नेला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरात बोलत होते.

नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाद्वारे आयोजित या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गायक शंकर महादेवन यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात मोहन भागवत यांनी गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे विशेष कौतुक केले. शंकर महादेवन यांनी यापूर्वी संघ म्हणजे सरगम असल्याचे म्हटले होते, पण आज त्यांनी संघालाच सरगम केले आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

आमची गती मर्यादित

मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा आणि मर्यादांचा उल्लेख यावेळी केला. यावेळी देशभक्तीच्या प्रसाराची जबाबदारी संपूर्ण समाजाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी मोहन भागवत म्हणाले, “देशभक्ती जगविणे हा संघाचा ठेका नाही. तो इतरांनी सुद्धा पुढे नेला पाहिजे. प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संघाची कार्यपद्धती अद्वितीय आहे, पण हा रस्ता कठीण आहे. आमची गती मर्यादित आहे”, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

संघ पोहोचो न पोहोचो, पण गीत नक्की पोहोचेल

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून शंकर महादेवन यांच्या गायनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संघगीत गाणे हे सामान्य गाणे गाण्यापेक्षा वेगळे आणि कठीण काम आहे. कारण या गीतांमध्ये जीवनाची तपस्या आणि भाव असतो. संघगीतांचा निर्माता कोण हे माहीत नसते, कारण त्यात जीवनाची तपस्या सामावलेली असते. संघाकडे वेगवेगळ्या भाषांमध्ये २५ हजारहून अधिक गीते आहेत. शंकरजींनी काल संघाची प्रार्थना गायली आणि आज गीत गायले, ते अगदी संघसेवकाने गावे असे गायले आहे. हे एक अशक्य कोटीचे काम आहे. देशभक्ती जागृत करणे हा केवळ संघाचा ठेका नाही, तर प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. यामुळे संघ पोहोचो न पोहोचो, पण हे गीत नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचेल, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम तृप्त करणारा

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा संघगीत लोकार्पण सोहळा ही संकल्पना आपली असल्याचे सांगितले. आपण सगळे निमित्तमात्र आहोत. संघाला खऱ्या अर्थाने शिकवण गीतातून मिळाली आहे. संगीत आणि गीतात मोठी ताकद असून, त्याचा परिणाम स्वयंसेवकांच्या संस्कारांवर होतो. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही कल्पना मनात आली. शंकर महादेवन यांनी अपेक्षेपेक्षा चांगले गीत गायले असून, हा कार्यक्रम तृप्त करणारा होता, असे नितीन गडकरी म्हणाले.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. तसेच शंकर महादेवन यांचेही आभार व्यक्त केले. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने या गीतांना एकत्रित करणे आवश्यक होते. ही गीते कोणी लिहिली हे माहीत नसले तरी ती संघसेवकांनी लिहिली आहेत. आजच्या जमान्यात कॉपीराईटचा प्रश्न असला तरी संघाने ते काम पूर्ण केले. ही सर्व गीते जीवन कशाप्रकारे जगावे हे दाखवणारी आहेत. जीवनात जेव्हा निराशा येते, तेव्हा हे गीत ऐकल्यावर आपलं ध्येय स्पष्ट दिसते,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.