सक्षम ताटे याला मारल्यानंतर आचल मामीलवाड हिची अत्यंत मोठी मागणी, म्हणाली, त्याच्या कुटुंबाला…

Nanded Crime News : प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली. सक्षमच्या हत्येनंतर प्रियसी थेट घरी पोहोचली आणि तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून आता आचल हिने मोठी मागणी केली आहे.

सक्षम ताटे याला मारल्यानंतर आचल मामीलवाड हिची अत्यंत मोठी मागणी, म्हणाली, त्याच्या कुटुंबाला...
Achal Mamilwad and Saksham Tate
Updated on: Dec 02, 2025 | 10:58 AM

नांदेडच्या सक्षम ताटे याची प्रेमप्रकरणातील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आचल मामीलवाड आणि सक्षम यांच्यात मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सक्षम कायमच आचलच्या घरी येत जात. सक्षम हा आचलच्या दोन्ही भावांचा मित्र होता. आचल आणि सक्षम यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती आचलच्या घरी समजली आणि तिथूनच सर्व खेळ सुरू झाला. आचलला दबाव टाकून तिच्या कुटुंबियांनी विनयभंगाची केस सक्षमविरोधात टाकायला लावली. त्यावेळी आचल अल्पवयीन होती. सक्षमसोबतच्या संपर्कात न राहण्यासाठी तिच्या कुटुंबियांकडून तिला त्रास दिला जात होता. त्यामध्येच सक्षम हा जेलमधून सुटून आल्यानंतर थेट त्याला मारण्याचा कट तिच्या कुटुंबियांकडून रचला जात होता. आपल्याला काय त्रास होत आहे, हे आचलने सक्षमला सांगितले होते.

आचलच्या दोन्ही भावांनी बहिणीपासून सक्षमला दूर राहण्याची समज दिली होती. मात्र, काहीही करून सक्षम आणि आचल वेगळे होत नव्हते. आचलची आई थेट सक्षमच्या घरी पोहोचली आणि तिने धमकी दिली. त्यानंतर सक्षमला शोधण्यासाठी त्याच्या घरी आचलचे कुटुंबिय पोहोचले. त्याला गोड बोलून बाहेर बोलावण्यात आले आणि तिथेच त्याचा काटा काढण्यात आला. सक्षमचे निधन झाल्यानंतर थेट त्याच्या आईसोबत पोलिस ठाण्यात आचल पोहोचली आणि म्हणाली की, मी तुमच्यासोबत येत आहे.

आचलने थेट सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. आयुष्यभर सक्षमची बायको म्हणून त्याच्या घरी राहणार असल्याचे आचलने म्हटले. सक्षमला कशाप्रकारे आपल्या भावांनी आणि वडिलांनी मारले हे सांगताना आचल दिसली. सक्षम ताटे याच्या घरी गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी आचल हिने थेट काही पोलिसांवरच गंभीर आरोप केली आणि एकच खळबळ उडाली.

आचल हिने म्हटले की, माझ्या कुटुंबाकडून सक्षम ताटे याच्या कुटुंबाला धोका आहे. सक्षम गेल्यानंतर माझे तर काहीच राहिले नाही, पण माझे कुटुंबिय सक्षमच्या कुटुंबाला काहीही करू शकतात. माझा भाऊ अल्पवयीन आहे तो जेलमधून बाहेर आल्यावर सक्षमसारखे त्याच्या कुटुंबासोबतही काही करू शकते. यामुळे सक्षमच्या कुटुंबाला संरक्षण मिळाले पाहिजे. सक्षमच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मोठी मागणी आचल हिने केली.

आचल हिच्या कुटुंबियांकडून तीन गोळ्या झाडून सक्षमची हत्या करण्यात आली. तीन गोळ्या लागूनही सक्षम पळत होता. मात्र, पळत असताना त्याचा पाय फरशीत अडकला. तीच फरशी सक्षमच्या डोक्यात घालण्यात आली. सक्षमच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत सर्व आरोपींना अटक केली. सक्षमच्या हत्येनंतर मोठे खुलासे आचल करताना दिसत आहे.