विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये हाणामारी, दुष्काळाच्या नात्यांनाही झळा, सिल्लोडमध्ये भावकीचा वाद पोलिसात
Chhatrapati Sambhajinagar Sillod Crime: राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे वाद आता थेट नात्यांमध्येही संघर्ष निर्माण करू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा शिवारात विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Chhatrapati Sambhajinagar Sillod Water Crisis : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे वाद आता थेट नात्यांमध्येही संघर्ष निर्माण करू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा शिवारात विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तक्रार दाखल झाल्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण दुष्काळाने पाणी वापरावरून आणि पीकं जगवण्यासाठी हा वाद टोकाला गेल्याचे समोर आले आहे. नात्यात पाण्यावरून दुरावा आला आहे. भाऊबंदकीचा वाद थेट पोलिसात पोहचला आहे.
अधिक वेळा पाण्याचा उपशावरून वाद
विहिरीचे पाणी वापरण्याचे नियोजन ठरलेले होते. त्यानुसार विलास निकम यांना 4 दिवस, तर त्यांच्या चुलत भावांना 2 दिवस पाणी वापरण्याचे ठरले होते. मात्र, ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ पाण्याचा उपसा केल्याने विलास निकम यांनी विरोध केला. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर कोटनांद्रा शिवारात विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा वाद पुढे पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
कोटनांद्रा येथील गट क्रमांक 161 मधील शेतात ही घटना घडली. चुलत भावांना 2 दिवस पाणी वापरण्याचे नियोजन ठरले होते. मात्र, ठरलेल्या वेळेपेक्षा त्यांनी अधिक वेळ पाण्याचा उपसा केल्याने विलास निकम आणि चुलत भावांमध्ये वाद विकोपाला गेला. याच कारणावरून कैलास साहेबराव निकम, विजय साहेबराव निकम, स्वप्नील कैलास निकम, कोकिळा कैलास निकम आणि अश्विनी विजय निकम यांनी विलास निकम यांच्यासह दोघांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी विलास बाबुराव निकम यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी 706 टँकर्स
मराठवाड्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली आहे. विभागीय आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार मराठवाड्यातील 450 गावे आणि 284 वाड्यांची तहान भागवण्यासाठी तब्बल 706 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे… विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरात टँकर्सच्या संख्येत 265 ने वाढ झाली आहे. 20 ऑक्टोबर रोजी विभागात 441 टँकर्स सुरू होते, आता हा आकडा 706 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 363 टँकर्स एकट्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत. टँकरमुक्त असलेल्या परभणी जिल्ह्यातही आता टँकर सुरू झाला आहे. तर हिंगोली, नांदेड आणि लातूर हे तीन जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. पावसाने दडी मारल्याने जलस्रोत आटत असून येत्या काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.