संजय दत्तच्या मराठीवरुन शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये जुंपली; महायुतीत नवीन वाद

अभिनेता संजय दत्तच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सवाल केला आहे. यामुळे महायुतीत नवीन वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.

संजय दत्तच्या मराठीवरुन शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्ये जुंपली; महायुतीत नवीन वाद
नरेंद्र मेहता, संजय दत्त आणि प्रताप सरनाईक
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2026 | 9:06 AM

अभिनेता संजय दत्तच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सवाल उपस्थित केला आहे. मेहता यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. ‘कलाकाराला मराठी येत नसल्याचं सांगताना तुम्ही हसता, अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता; हा कोणता न्याय?’ असा थेट सवाल नरेंद्र मेहता यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर सत्ताधारी महायुतीमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

काय म्हणाला संजय दत्त?

ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेता संजय दत्त म्हणाला, “मी सहा वर्षे येरवडा कारागृहात होतो, तरीही मराठी शिकलो नाही.” त्यावेळी संजय दत्तच्या शेजारी असलेले प्रताप सरनाईक हसल्याचं पाहायला मिळालं. याच मुद्दयावरून आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांना सवाल केला आहे. ‘कलाकाराला मराठी येत नसेल तर हरकत नाही, तुम्ही त्यावर हसता. दुसरीकडे सर्वसामान्य रिक्षाचालकांना मराठी सक्ती करून दमदाटी करता, हा कोणता न्याय? एकनाथ शिंदे यांनी त्यांना कधीच काही करू दिलं नाही. डमी मंत्री लागतात म्हणून ते आहेत,’ अशी टीकाही नरेंद्र मेहता यांनी केली.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर, स्थानिक नागरिकांशी संवाद आणि सार्वजनिक जीवनात मराठीला प्राधान्य याबाबत सातत्याने भूमिका मांडल्या जातात. मात्र, याच मुद्द्यावरून आता नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना थेट लक्ष्य केलं आहे. मराठी भाषेच्या अंमलबजावणीच्या नावाखाली सर्वसामान्यांवर कठोर भूमिका घेतली जात असेल, तर त्याच निकषांचा वापर इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींवरही झाला पाहिजे, असा त्यांच्या वक्तव्याचा सूर आहे.

दरम्यान, मराठी भाषेचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच संवेदनशील राहिला आहे. स्थानिक पातळीवर रिक्षाचालक, दुकानदार, व्यावसायिक आणि इतर सेवा देणाऱ्या व्यक्तींनी मराठीत संवाद साधावा, यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून वेळोवेळी भूमिका घेतल्या जातात. त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावर वेगळी भूमिका आणि सर्वसामान्यांबाबत वेगळी भूमिका का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील दोन घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिकरित्या शाब्दिक संघर्ष झाल्याने या मुद्द्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us